जयंती विशेष : नर्गिस समोर आल्यावर एक शब्दही बोलू शकले नव्हते सुनील दत्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2017 5:46 AM
अभिनेता सुनील दत्त आज आपल्यात नाहीत. सुनील दत्त उर्फ बलराज दत्त यांचा आज वाढदिवस आहे. १९२९ मध्ये आजच्या दिवशी ...
अभिनेता सुनील दत्त आज आपल्यात नाहीत. सुनील दत्त उर्फ बलराज दत्त यांचा आज वाढदिवस आहे. १९२९ मध्ये आजच्या दिवशी (६ जून) रोजी त्यावेळी पाकिस्तानात असलेल्या पंजाबच्या झेलम जिल्ह्यातील खुर्दी गावात त्यांचा जन्म झाला. अर्थात त्यांचे आयुष्य इतरांप्रमाणे सोपे नव्हते. केवळ पाच वर्षांच्या वयात सुनील दत्त यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. १८ वर्षांच्या वयात त्यांना भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदना झेलाव्या लागल्या. याच काळात ते भारतात आले. भारतात सुनील दत्तच्या वडिलांचे मित्र याकुब यांनी त्यांची मदत केली. फाळणीनंतर सुनील आपल्या कुटुंबीयांबरोबर हरियाणाच्या यमुना नगर स्थित मंडोली गावात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी आपला काही काळ लखनऊमध्ये घालवला. येथून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सुनील यांनी मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्येही शिक्षण घेतले. शिवाय रेडिओवर आरजे म्हणून नोकरीही केली. सिलोन रेडिओमध्ये आरजेची नोकरी करत असताना त्यांच्या फिल्मी करिअरलाही सुरुवात झाली. असे म्हटले जाते की, जय हिंद कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी काही काळ मुंबईतील 'बेस्ट' या लोकल बसमध्येही नोकरी केली.१९५५ मध्ये अभिनेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने सुनील दत्त यांना मुंबईत आणले. सुनील हे त्यांचे खरे नाव नव्हते. त्यांचे खरे नाव बलराज दत्त असे होते. बलराजचे सुनील कसे झाले, ही कथा खूप इंटरेस्टिंग आहे. सुनील मुंबईत आले तेव्हा बलराज साहनी बॉलिवूडमध्ये एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखले जात होते. एकाच नावाचे दोन हिरो इंडस्ट्रीत चालणार नाही, असे कुणीतरी बोलले आणि मग बलराज दत्तचे सुनील दत्त झाले. अर्थात नाव बदलल्यानंतरही बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी सुनील दत्त यांना कठीण संघर्ष करावा लागला. १९६६ मध्ये सुनील दत्त यांचा ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ हा सिनेमा आला. मात्र या चित्रपटाने सुनील दत्त यांना फार ओळख दिली नाही. यानंतर ‘कुंदन’,‘राजधानी’,‘किस्मत का खेल’,‘पायल’ यासारख्या लहान चित्रपटांत ते दिसले. पण तोपर्यंत यश त्यांच्यापासून बरेच दूर होते.पण १९५७ मध्ये त्यांच्या नशीबाने एकदम कलाटणी घेतली. ‘मदर इंडिया’ने सुनील यांना खरी ओळख दिली. या चित्रपटात अभिनेत्री नर्गिस यांनी सुनील दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. पण या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सुनील दत्त यांना नर्गिसशी प्रेम झाले. सिलोन या प्रसिद्ध रेडिओ वाहिनीवर आरजे म्हणून काम करत असताना नर्गिस यांची मुलाखत घेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र संधी मिळाल्यानंतर ते नर्गिससमोर एक शब्दही बोलू शकले नाहीत. त्यामुळे ती मुलाखत रद्द करण्यात आली. पुढे १९५७ साली सुनील दत्त यांना ‘मदर इंडिया’ या सिनेमात नर्गिसबरोबरच काम करण्याची संधी मिळाली. ‘मदर इंडिया’च्या सेटवर अचानक आग लागली असता, सुनील दत्त यांनी जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचा जीव वाचवला. या घटनेनंतर नर्गिस व सुनील एकमेकांच्या प्रेमात बुडाले. पुढे त्यांनी लग्नही केले. सत्तरच्या दशकात सुनील दत्त यांनी काही धार्मिक पंजाबी सिनेमांमध्येही काम केले होते. मन जीते जग जीत , दुख भंजन तेरा नाम आणि सतश्री अकाल हे त्यांचे काही पंजाबी चित्रपट. सुनील दत्त यांनी बॉलिवूडच्या वीस सिनेमांमध्ये दरोडेखोराची भूमिका साकारली होती. २०१३ मध्ये आलेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ त्यांचा शेवटचा चित्रपट. २५ मे २००५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.