'बडे अच्छे लगते है' मालिकेतून राम कपूर व साक्षी तन्वर या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते. त्यांची एकता कपूर निर्मित 'करले तू भी मोहब्बत' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर २०१७ साली प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर या सीरिजचा दुसरा सीझनही प्रसारीत झाला. या दोन्ही सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या निमित्ताने राम कपूरशी केलेली बातचीत...
- तेजल गावडे.
या सीझनमध्ये काय पाहायला मिळणार आहे?
'करले तू भी मोहब्बत' वेबसीरिजच्या आधीच्या सीझनपेक्षा हा सीझन वेगळा आहे. कारण पहिल्या सीझनमध्ये मैत्री पाहिली. दुसऱ्या सीझनमध्ये प्रेम व लग्न पाहिले आणि आता तिसऱ्या सीझनमध्ये द्वेष पाहायला मिळणार आहे. कारण दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, ज्यामुळे करण खन्ना (राम कपूर) टीप्सी (साक्षी)चा खूप द्वेष करतो. तिला उद्धवस्त करून टाकण्याचा प्रयत्न करतो. या सीझनमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदा आमच्या प्रेक्षकांना आम्ही दोघे वेगळ्या अंदाजात दिसणार आहोत. ही नवीन बाब आहे, जी यापूर्वी मी व साक्षीने कधी केले नव्हते. त्यामुळे आम्ही या सीझनबाबत खूप उत्साही आहोत. मला वाटते की प्रेक्षकांसाठी हा सीझन कमालीचा ठरणार आहे.
साक्षी व तुझी केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते. मात्र आगामी या सीझनमध्ये तू साक्षीचा द्वेष करताना दिसणार आहेस, तर याचा प्रेक्षकांवर नकारात्मक प्रभाव पडेल, असे तुला वाटते का? या सगळ्या गोष्टींचा विचार करणे कलाकारांचे काम नाही. कलाकाराचे स्क्रीप्ट वाचून संवाद लक्षात ठेवून अभिनय करण्याचे काम असते. जर कलाकारांने या गोष्टीचा निगेटिव्ह परिणाम होईल, असा विचार केला. तर अभिनय चांगला होणार नाही. त्यामुळे स्क्रीप्ट वाचून संवाद लक्षात ठेवून त्या भूमिकेला न्याय देणे हे कलाकाराचे काम असते. त्याच्यानंतर त्यावर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येत आहेत, त्याचा विचार निर्मात्याने करावा.
वेबसीरिज व मालिका या माध्यमात काम करताना तुला काय तफावत जाणवतो?सर्वात मोठा फरक हा जाणवतो की वेबसीरिजमध्ये डेडलाइनचे प्रेशर अजिबात नसते. टेलिव्हिजनमध्ये प्रसारीत करण्याची वेळ असल्यामुळे प्रत्येक महिन्यात १६ ते २० एपिसोडचे शूटिंग करावेच लागते. त्यामुळे इथे डेडलाईनचे दडपण असते. वेबसीरिज थोडीफार चित्रपटासारखी असते. त्यामुळे आरामात काम करू शकतो. पूर्ण झाल्यानंतर ते ऑन एअर जाणार असते. त्यामुळे काम करण्यासाठी व क्रिएटिव्हिटीसाठी खूप वेळ असतो.
आगामी प्रोजेक्टबद्दल सांग? 'करले तू भी मोहब्बत'च्या चौथ्या सीझनबद्दल सध्या बोलणे सुरू आहे. त्याच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात होईल. याशिवाय एका चित्रपटात मी काम करणार आहे. ज्याच्या चित्रीकरणाला पावसाळ्यानंतर सुरूवात होईल. त्याबद्दल तुम्हाला पुढच्या वर्षी समजेल. त्याबद्दल आता बोलणे उचित ठरणार नाही.