Join us  

Juhi Chawla Birthday : -अन् सलमान-जुहीचं लग्न होता होता राहिलं....; सल्लूने घातलेली लग्नाची मागणी, पण मग कुठे फिस्कटलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 1:43 PM

Juhi Chawla Birthday : सलमान खानने जुहीला लग्नाची मागणी घातली होती... ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. खुद्द सलमानने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

Juhi Chawla Birthday : 80 व 90 चं दशक गाजवणारी अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) आज  55 वर्षांची झालीये. होय, आज जुही चावला तिचा वाढदिवस साजरा करतेस. मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर जुही बॉलिवूडमध्ये आली. 1987 साली ‘सल्तनत’मधून तिचा डेब्यू झाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून बघितलं नाही. डर,दीवाना मस्ताना, इश्क, हम है राही प्यार के असे एकापेक्षा एक हिट सिनेमे तिने दिलेत. 1995 साली जुहीने बिझनेसमॅन जय मेहतासोबत गुपचूप लग्न केलं. पण त्याआधी जुहीला सलमान खानने (Salman Khan) लग्नाची मागणी घातली होती. होय, ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. खुद्द सलमानने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

एकेकाळी सलमान जुहीवर फिदा होता. इतका की, त्याने तिच्या वडीलांकडे लग्नाची मागणी घातली होती. सलमान जुहीच्या वडिलांकडे गेला आणि त्याने थेट जुहीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली. यानंतर काय झालं, हे सलमानने या मुलाखतीत सांगितलं होतं.‘जुही खूप गोड आणि प्रेमळ आहे. मी तिच्या वडिलांनाही जुहीसोबत मी लग्न करू शकतो का? असं विचारलं होतं. पण तिच्या वडिलांनी मला नकार दिला. कदाचित मी त्यांना आवडलो नसेल. त्यांना काय हवं होतं, माहित नाही?,’ असं सलमान या मुलाखतीत म्हणाला होता.

यशाच्या शिखरावर असताना जुहीने अचानक लग्न केलं. अर्थात अनेक वर्षे जुहीच्या लग्नाची भणकही कुणाला लागली नाही. तिने अगदी पद्धतशीरपणे हे लग्न जगापासून लपवून ठेवलं. पुढे अनेक वर्षांनी तिने यामागच कारण सांगितलं होतं. एका मुलाखतीत जुहीने लग्न लपवण्यामागच्या कारणांचा खुलासा केला. ती म्हणाली होती, ‘त्यावेळी इंटरनेट नव्हतं. प्रत्येक फोनमध्ये कॅमेराही नव्हता. त्यामुळे माझं लग्न झालेय, हे लपवणं सहज शक्य झालं. लग्न झालं त्यादरम्यान मी यशाच्या शिखरावर होते. मला लग्नानंतरही काम करायचं होतं.  लग्नाचा खुलासा केला तर करिअर संपेल, अशी भीती मला होती. त्यामुळे मी शांत बसले आणि काम करत राहिले.’

 1995 साली जुहीने बिझनेसमॅन जय मेहतासोबत लग्न केले. ही लव्हस्टोरी कशी सुरु झाली होती, याचाही खुलासा तिने केला होता. तिने सांगितलं होतं, ‘बॉलिवूड डेब्यूआधीच एकदा जयसोबत भेट झाली होती. पण ही भेट खूपच छोटी होती. चित्रपटात काम करायला लागल्यानंतर जयसोबत कुठलाही संपर्क नव्हता. पण काही वर्षांनंतर एका मित्राच्या डिनर पार्टीत आम्ही पुन्हा भेटलो आणि आमच्यात मैत्री झाली. यानंतर मी जिथे असेल तिथे जय हजर असायचा. मी एखाद्या ठिकाणी पोहोचले की तो फुलांचा गुच्छ आणि गिफ्ट घेऊन आधीच पोहोचलेला असायचा. माझ्या एका वाढदिवसाला त्याने मला ट्रकभर गुलाबांची फुलं पाठवली होती. यानंतर वर्षभराने त्याने मला प्रपोज केलं होतं.’

टॅग्स :जुही चावला सलमान खानबॉलिवूड