Join us

जुही चावलाने माधुरी दीक्षितसोबत 'दिल तो पागल है' सिनेमात काम करण्यास दिला होता नकार?, अभिनेत्रीने सांगितलं होतं यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 8:53 AM

जुहीने सुपरहिट सिनेमा दिल तै पागल है मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम करण्यास नकार दिला होता. अभिनेत्रीने एका मुलाखती दरम्यान याबाबतचा खुलासा केला होता.

जुही चावला तिच्या काळातील सुपरस्टार आहे. तिने त्या काळातील जवळपास सर्वच मोठ्या स्टार्ससोबत काम केले.  १९८६ला आलेल्या सल्तनत  सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र जुहीने सुपरहिट सिनेमा दिल तै पागल है मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम करण्यास नकार दिला होता. अभिनेत्रीने एका मुलाखती दरम्यान याबाबतचा खुलासा केला होता. 

जुही आणि माधुरीची कारकिर्द एकाच काळातील असली तरी त्या दोघींनी गुलाबी गँग या चित्रपटाच्या आधी कधीच एकत्र काम केले नव्हते. माधुरीसोबत काम करण्याची संधी जुहीकडे चालून आली होती. पण तिने त्यासाठी नकार दिला होता. दिल तो पागल है हा यश राज फिल्मसचा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात माधुरी आणि करिश्मा अशा दोन अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. या चित्रपटात निशाची भूमिका करिश्माने साकारली होती. मात्र निशाच्या भूमिकेसाठी करिश्मा ही यश चोप्रा यांची पहिली चॉईस नव्हती. या चित्रपटात जुहीने निशाची भूमिका साकारावी असे यश चोप्रा यांचे म्हणणे असल्याने त्यांनी जुहीला त्यासाठी विचारले देखील होते. पण जुहीने या चित्रपटासाठी नकार दिला होता.  याविषयी जुहीने एका मुलाखतीच्या दरम्यान देखील सांगितले होते. जुहीने सांगितले होते की, त्यावेळी मला माधुरी दीक्षितसोबत सेकेंड लीड रोल करायचा नव्हता. अनेकवेळा तुम्ही चुकीचे निर्णय घेता. डर या चित्रपटातील माझा अभिनय आवडल्यानेच यश चोप्रा यांनी मला दिल तो पागल है या चित्रपटाची ऑफर दिली होती. 

जुहीने या मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या इगोमुळे काही चित्रपट गमावले. मला त्याकाळात वाटत होते की, मी चित्रपटांमध्ये काम केले नाही तर इंडस्ट्रीला दुसरा पर्याय मिळणार नाही. मी माझ्या इगोमुळे अनेक चांगल्या संधी धुडकावल्या. मी ज्या लोकांसोबत कर्म्फटेबल आहे, त्यांच्यासोबतच मी त्यावेळी काम करत होते. तसेच मी कठीण भूमिका स्वीकारत नव्हते. याच कारणांमुळे मी काही चित्रपटांना नकार दिला.

जुहीने पुढे सांगितले की, राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है हे दोन्ही चित्रपट मी नाकारले. पण या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले. हे दोन्ही चित्रपट करिश्माला मिळाले आणि दिल तो पागल है या चित्रपटासाठी तर तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

जुही चावलाने 'कयामत से कयामत तक', 'हम है राही प्यार कै', 'डर' आदी बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. १९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले. तिला नव्वदीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानले जात असे. तिने तिच्या कारकिर्दीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या असून या भूमिकांसाठी तिला पुरस्कार देखील मिळाले आहेत.

टॅग्स :जुही चावला माधुरी दिक्षित