जुही चावलाचा आज म्हणजेच १३ नोव्हेंबरला वाढदिवस असून तिचा जन्म हरयाणा मधील आहे. तिचे वडील सरकारी ऑफिसर होते. तिचे सगळे शिक्षण मुंबईत झाले आहे. मुंबईतील सिडनम कॉजेलमध्ये ती होती. तिने १९८४ ला मिस इंडियाचा किताब मिळवला आणि तिचे आयुष्यच बदलले. तिने १९८६ला सलतनत या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले. तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी कयामत से कयामत तक या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तिने प्रतिबंध, हम है राही प्यार के, बोल राधा बोल, दरार, यस बॉस, गुलाब गँग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच झलक दिखला जा या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर देखील जलवा दाखवला आहे.
जुहीने चित्रपटात काम करण्यासोबतच फिर भी दिल है हिंदुस्थानी, अशोका, चलते चलते या चित्रपटांची निर्मिती केली आहे. जुहीचे पती जय मेहता हे प्रसिद्ध इंडस्ट्रीयालिस्ट असून त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. सामाजिक विषयांवर जुही नेहमीच भाष्य करते. लोकांनी ऑर्गनिक खाद्यपदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा याकडे तिचा कल असतो. ती स्वतः गेल्या सात वर्षांपासून शेती करत आहे. याविषयी तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, महाराष्ट्रातील वाडा येथे माझी शेतजमीन असून तिथे मी शेती करते. माझ्या वडिलांनी २० एकर जमीन वाडा येथे खरेदी केली होती. त्यावेळात मला शेतीविषयी काहीच माहिती नव्हते. मी त्या काळात माझ्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने मी त्याकडे कधी लक्ष देखील दिले नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे मी ठरवले. गेल्या सात वर्षांपासून मी शेती करत असून माझ्या शेतात २०० हून अधिक आंब्यांची झाडं आहेत. तसेच चिकू, पपई, डाळींब यांसारखी फळं देखील माझ्या शेतात पिकवली जातात. यासोबत माझ्या मांडवा येथील शेतजमिनीत मी भाज्या पिकवते. ही माझी १० एकर जमीन असून काही वर्षांपूर्वी मी विकत घेतली. माझ्या पतींचे अनेक रेस्टॉरंट असून तिथे भाज्या माझ्या शेतातूनच जातात. तुम्ही एकदा ऑर्गेनिक फळं, भाज्या खायला लागलात की बाजारात मिळणाऱ्या केमिकल मिश्रीत भाज्यांना तुम्ही पूर्णपणे विसरून जाल याची मला खात्री आहे.