Join us

हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचली जुही चावला, केलं पवित्र स्नान, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:57 IST

देशभरातून भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. अनेक सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात सहभागी होत दर्शन घेत आहेत.

Juhi Chawla: प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.  या कुंभमेळ्यानं जगभराचं लक्ष वेधून घेतलं आहे. सामान्यांपासून ते अनेक मोठ-मोठ्या कलाकारांपर्यंत सगळेच महाकुंभमेळ्याला हजेरी लावत असून पवित्र स्नानाचा आनंद घेत आहेत. अशातच आता अभिनेत्री जुही चावला सुद्धा प्रयागराजला पोहोचली. अभिनेत्रीने महाकुंभमेळ्यातील सुखद अनुभव शेअर केला आहे.

महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला पोहोचलेल्या स्टार्सच्या यादीत आता जुहीचाही समावेश झाला आहे.  जुही चावलानं त्रिवेणी संगमात स्नान केलं. हा तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव असल्याचं तिनं म्हटलं आहे. पवित्र स्नानानंतर जुहीनं माध्यमांशी संवाद साधला आणि उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल पोलिस आणि अधिकाऱ्यांचं कौतुक केले. ती म्हणाली, "आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर सकाळ होती. सकाळी ७:३० वाजता सूर्य उगवला, थंडगार सूर्यप्रकाश आणि सुंदर पाणी होतं. मोठ्या भक्तीनं आम्ही थंडगार पाण्यात स्नान केलं.  मला इतकं आवडलंय की तिथून निघावं वाटतं नव्हतं. खूप सुंदर, सर्वांचे आभार".

जुहीच्याआधी विवेक ओबेरॉयदेखील आपल्या कुटुंबासह प्रयागराजला पोहोचला होता. त्यानेही महाकुंभातील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं. तर जुही आणि विवेकसह आतापर्यंत अनुपम खेर, भाग्यश्री, विजय देवरकोंडा, मिलिंद सोमण, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांच्यासह अनेक कलाकारांनी महाकुंभला भेट दिली आहे. १४४ वर्षांनी आलेला हा योग चुकू नये म्हणून सेलिब्रिटी प्रयागराज येथे दाखल होत कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. 

कुंभमेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा सुरू आहे. यंदाचा कुंभमेळा अनेक अर्थांनी खास आहे. गेल्या १३ जानेवारीपासून सुरू झालेला हा महाकुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दर १२ वर्षांनी कुंभमेळा येतो, पण यावेळी तो अधिक विशेष आहे. कारण १४४ वर्षांनंतर निर्माण होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे या महाकुंभमेळ्याचे अधिक महत्त्व आहे.  कुंभमेळ्यात स्नान करण्याची संधी मिळणे भाग्याचे समजले जाते.

टॅग्स :जुही चावला कुंभ मेळा