कारवां, हाथी मेरे साथी, मेरा नाम जोकर यांसारख्या चित्रपटांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर महमूद (Junior Mehmood) यांचे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. दीर्घकाळ कर्करोगाशी झुंजत असलेल्या ज्युनियर महमूद यांनी गुरुवारी रात्री राहत्या घरी प्राणज्योत मालवली. त्यांचा दफनविधी नुकताच पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. जॉनी लीव्हर, शैलेश लोढा, सुनील पाल, यशपाल शर्मा, रझा मुराद, आदित्य पांचोली आणि कॉमेडियन जावेद यांच्यासह अनेक चित्रपट कलाकारांनी ज्युनियर मेहमूद यांनी हजेरी लावली होती.
सोशल मीडियावर ज्युनियर मदमूद यांना अखेरचा निरोप घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ज्युनियर महमूद यांच्या जवळचे व्यक्ती त्यांना अंतिम निरोप देताना दिसत आहेत. ज्युनियर महमूद यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत, ज्युनियर महमूद यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करून आपला अभिनय आणि विनोदी कौशल्य सिद्ध केले होते. दोन आठवड्यांपूर्वीच अभिनेता स्टेज ४ कॅन्सरशी लढा देत असल्याची माहिती समोर आली होती. गुरुवारी रात्री त्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांचे निधन झाले.
ज्युनियर महमूद यांचे खरे नाव नईम सय्यद होते. आपल्या चित्रपट कारकिर्दीत, त्यांनी कटी पतंग, मेरा नाम जोकर, परवरिश आणि दो और दो पांच यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. ज्युनियर महमूद यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात 'नौनिहाल' या चित्रपटाद्वारे केली, ज्यामध्ये संजीव कुमार, बलराज साहनी आणि इंद्राणी मुखर्जी हे दिग्गज कलाकार होते. १९६७ मध्ये रिलीज झालेल्या 'नौनिहाल'पासून आतापर्यंत या अभिनेत्याने ज्युनियर महमूद या नावाने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मितीही केली.