Join us

Kaala Trailer : काला दादाची सीटीमार डायलॉगने एंट्री; धारावीचे ‘मसीहा’ बनले रजनीकांत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 8:34 AM

रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित ‘काला’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये ते मुंबईतील धारावी झोपडपट्टीचे मसीहा बनताना दिसत आहे. सीटीमार डायलॉगने त्यांची झालेली एंट्री थक्क करणारी आहे.

सुपरस्टार रजनीकांत आपल्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा पडद्यावर धूम उडवून देण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या आगामी ‘काला’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये त्यांचा धमाकेदार अंदाज आणि स्टाइल थक्क करणारी आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता नाना पाटेकर एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसत असून, काला रजनीकांत यांना तो एका डायलॉगमध्ये रावण म्हणत आहे. ट्रेलरमध्ये रजनीकांत यांचा लूक बघण्यासारखा आहे. ते नेहमीसारखेच व्हायब्रेंट आणि स्टायलिश अंदाजात दिसत आहेत. अ‍ॅक्शनचा जबरदस्त डोज आणि डायलॉग खूपच मजेशीर आहेत. चित्रपटाची कथा धारावी झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर आहे. ‘काला’बद्दल सुरुवातीला असे म्हटले जात होते की, हा चित्रपट मुंबई अंडरवर्ल्डचा डॉन हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित आहे. मात्र निर्मात्यांनी हा दावा सुरुवातीपासूनच फेटाळून लावला आहे. धनुष निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पा. रंजित यांनी केले आहे. रजनीकांत यांच्यासोबत त्यांचा हा दुसरा चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी २०१६ मध्ये आलेल्या ‘कबाली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, ‘काला’ या चित्रपटाला संतोष नारायण यांनी संगीत दिले आहे. ‘काला’ या चित्रपटात समुथिरकानी, अंजली पाटील, शिवाजी शिंदे आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या बड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. दरम्यान, रजनीकांत यांच्या चाहत्यांना गेल्या काहीकाळापासून ‘काला’ या चित्रपटाची आतुरता लागून आहे. या चित्रपटात रजनीकांत गरिबांचे ‘मसीहा’ म्हणून दाखविले जाणार असल्याने या चित्रपटालाही त्यांच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. ‘शिवाजी द बॉस’ आणि ‘कबाली’ या चित्रपटातही त्यांचा असाच काहीसा अंदाज बघावयास मिळाला होता. अशात हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी परफेक्ट ट्रीट ठरण्याची शक्यता आहे.