अभिनेता संजय मिश्राने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये खूप छोट्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने चाणक्य या मालिकेद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेच्या केवळ एका दृश्यासाठी त्यांनी 28 टेक दिले होते. सत्या, दिल से यांसारख्या चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने जमीन, फस गया रे ओबामा, आँखो देखी, ऑल द बेस्ट, गोलमाल, मसान या चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली.
अभिनेता संजय मिश्राचा आगामी चित्रपट कामयाब लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन तो सध्या करत आहे. या चित्रपटाची कथा एका चरित्र अभिनेत्याच्या आयुष्याभोवती फिरते. स्ट्रगलिंग कलाकारांचा अड्डा समजल्या जाणाऱ्या वर्सोवा येथील आराम नगर भागात चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक मेहता यांच्यासोबत जाऊन संजय मिश्राने नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशन केले. तसेच त्याने तिथल्या एका स्थानिक बुर्जी पावच्या गाडीवर स्वतः बुर्जी पाव बनवला. या निमित्ताने स्वत:च्या स्ट्रगलिंग दिवासताल्या आठवणींना संजय मिश्राने उजाळा दिला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरिद्वार येथे संजय मिश्राचा देखील स्वत:चा ठेला होता आणि त्या ठिकाणी रोहित शेट्टीने त्याला सगळ्यात पहिल्यांदा पाहिले होते.
या चित्रपटाच्या निमित्ताने संजय मिश्राच्या आयुष्याचे एक चक्र पूर्ण झाले आहे. शाहरुख खानच्या चित्रपटामधून आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या संजय मिश्राच्या 'कामायाब' या चित्रपटाची निर्मिती स्वतः शाहरुख खानने केली आहे. गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा द्वारे निर्मित कामायाब हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होत असून दृष्यम फिल्म्स प्रोडक्शनसोबत रेड चिल्लीज एंटरटेनमेंट या चित्रपटाचे प्रेझेंटर आहेत.