मीटू मोहिमेचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटले. लैंगिक शोषणाचे आरोप लागल्यानंतर अनेकांना आपल्या हातचे प्रोजेक्ट गमवावे लागलेत. यातलेच एक नाव म्हणजे, दिग्दर्शक विकास बहल. होय, विकाल बहलवर लैंगिक शोषणाचे आरोप लागलेत आणि यानंतर हृतिकच्या ‘सुपर 30’ या चित्रपटातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण यामुळे ‘सुपर 30’ रखडला. चित्रपटाचे उर्वरित दिग्दर्शन व पोस्ट प्रॉडक्शनचे काम कोण करणार,असा प्रश्न निर्माण झाला. मध्यंतरी ही जबाबदारी हृतिक स्वत:च पार पाडणार,असे वृत्त आले. पण आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय. हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट आता सलमान खान आवडता दिग्दर्शक पूर्ण करणार, असे वृत्त आहे. हा दिग्दर्शक कोण तर कबीर खान.
होय, कबीर खान ‘सुपर 30’च्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण करणार आहे. एका दुस-या दिग्दर्शकाचा चित्रपट पूर्ण करणे, हे काम खरे तर सोपे नाही. पण कबीर खानने ही जबाबदारी स्वीकारलीय. कबीर खान सध्या कपिल देव यांच्या ‘83’ या बायोपिकमध्ये बिझी आहे. याआधी त्याने सलमान खानसोबत ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘ट्युबलाईट’ असे अनेक चित्रपट साकारले आहेत.
‘सुपर 30’चे आत्तापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या चित्रपटात हृतिक रोशन सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंद कुमारची भूमिका वठणार आहे. पुढील वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. नेमक्या याच तारखेला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्सआॅफिसवर हृतिक विरूद्ध कंगना असा सामना पाहायला मिळणार आहे.