शाहिद कपूरने गेल्या काही वर्षांत एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा कबीर सिंग हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे, विशेष करून शाहिदच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंह’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटामुळे शाहिदचे कौतुक होत आहे पण याचसोबत तो टीकेचा धनी देखील ठरतोय. महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटातील सनकी हिरो काही जणांना भावला नाही. पण शाहिदच्या फॅन्सने हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे.
कबीर सिंग या चित्रपटाने केवळ पाच दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार पाडला आहे. या चित्रपटाला सगळीकडेच खूप चांगला प्रतिसाद मिळत असून अर्जुन रेड्डी या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा रिमेक आहे. अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंग या दोन्ही चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वंगा आहेत. फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्शच्यानुसार, मंगळवारी या चित्रपटाने १६.५ कोटीचा गल्ला जमवत १०४ कोटी इतकी कमाई बॉक्स ऑफिसवर केली. या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहाता इंडस्ट्रीतील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अक्षय कुमारच्या केसरीने सात दिवसात, गल्ली बॉयने आठ दिवसांत, टोटल धमालने नऊ दिवसांत १०० करोड रुपये इतकी कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. पण शाहिदच्या कबीर सिंगने या सगळ्यांचा रेकॉर्ड मोडला आहे. केवळ सलमानच्या भारत या चित्रपटाचा रेकॉर्ड कबीर सिंगला मोडता आला नाही. भारतने केवळ चार दिवसांत १०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.
शाहिद कपूरच्या आतापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांपेक्षा सगळ्यात जास्त ओपनिंग कबीर सिंग या चित्रपटाला मिळाली असून कबीर सिंगला मिळालेल्या या यशामुळे या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रचंड खूश आहे.