शाहिद कपूर व कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंग’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट झाला. आत्तापर्यंत या चित्रपटाने 226 कोटींचा गल्ला जमवला. एकीकडे प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला, दुसरीकडे काही लोकांनी या चित्रपटावर टीकाही केली. चित्रपटाचा हिरो हिरोईनला थप्पड मारतो, ही एकप्रकारे हिंसा आहे, अशी टीका काहींनी केली. ‘कबीर सिंग’च्या अपार यशानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी या टीकेला उत्तर दिले.
‘जेव्हा मी हा चित्रपट बनवणे सुरु केले, तेव्हाच हा सुपरडुपर हिट होणार, हे मला ठाऊक होते. पण मला लोकांचा रागही सहन करावा लागेल, याचा विचार मी केला नव्हता,’ असे वांगा म्हणाले. या चित्रपटात महिलांसोबत गैरवर्तन करताना दाखवण्यात आलेय, याबद्दल छेडले असता, वांगा यांनी वेगळेच उत्तर दिले. ‘जेव्हा तुम्ही एखाद्या महिलेवर जीवापाड प्रेम करता आणि तुमच्याकडे तिला थप्पड मारण्याचे स्वातंत्र्य नसेल तर इमोशन्स कसे दिसणार? चित्रपटात हिरो हिरोईनलाच नाही तर हिरोईनही हिरोला थप्पड मारतेय. तुम्ही हिरोईनला स्पर्श करू शकत नाही, किस करू शकत नाही तर फिलिंग्स कशा दाखवायच्या. मी महिलांसोबत आहे. यापेक्षा मी काहीही बोलू इच्छित नाही. काही लोकांनी ‘कबीर सिंग’ला 2 स्टार दिले होते. पण प्रेक्षकांनी आम्हाला 200 कोटी दिलेत,’ असे वांगा यावर म्हणाले.
वांगा यांचे हे उत्तर अनेकांच्या पचनी पडले नाही. यावरूनही त्यांच्यावर टीका झाली. या टीकेनंतर वांगा यावर खुलासा देताना दिसले. तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला. ही कुठल्याहीप्रकारे हिंसा नाहीत. दोन लोक एकमेकांवर अपार प्रेम करत असतील तर एकमेकांप्रतीचा रागही ते व्यक्त करू शकतात. हा राग दाखवण्याचे स्वातंत्र्य तुमच्याकडे असू नये का? दारू पिऊन हिरो हिरोईनला रोज मारतोय, असे आम्ही दाखवले नाही. मी फक्त इमोशन्स दाखवण्याबद्दल बोललो. हे इमोशन्स पुुरूष आणि महिला दोघांसाठीही आहेत. पण माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, असे ते म्हणाले. मी संपूर्ण जगाला खुलासे देऊ श्कत नाही. मी फक्त एवढेच म्हणेल की, प्रेम आहे तर कुठलीही भावना व्यक्त करण्यास लाजण्याचे कारण नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.