काही वर्षांपूर्वी आलेला शाहीद कपूरचा (Shahid Kapoor) 'कबीर सिंह' (Kabir Singh) सिनेमा आठवतच असेल. या सिनेमातील शाहीदची भूमिका प्रेक्षकांना फारशी पटली नव्हती. त्याच्या भूमिकेवर प्रचंड टीका झाली होती. मात्र तरी सिनेमा हिट झाला. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. आता त्यांचा 'अॅनिमल' हा सिनेमा चर्चेत आहे. दरम्यान 'कबीर सिंह' साठी शाहीद कपूर नाही तर दुसऱ्याच अभिनेत्याला भूमिका ऑफर करण्यात आली होती.
कबीर सिंह हा सिनेमा विजय देवरकोंडाच्या 'अर्जुन रेड्डी' चा रिमेक होता. संदीप रेड्डी वांगा यांना या सिनेमात शाहीद कपूरला घ्यायचेच नव्हते. नुकतंच एका मुलाखतीत ते म्हणाले, 'मला अर्जुन रेड्डीच्या रिमेकसाठी सतत बॉलिवूडमधून कॉल्स येत होते. ही ऑफर रणवीर सिंहला (Ranveer Singh) देण्यात आली होती. मला त्याच्यासोबत काम करायचं होतं. पण त्याने फिल्मचा विषय खूपच डार्क आहे म्हणत नकार दिला. मला वाटलं आता काही लवकर सिनेमा होत नाही म्हणून मी दुसऱ्या तेलुगू सिनेमावर लक्ष द्यायला सुरुवात केली.'ते पुढे म्हणाले, 'जर रिमेक चालला नसता तर दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी ती लाजिरवाणी गोष्ट असली असती. इंडस्ट्रीतील सर्वांनीच अर्जुन रेड्डी पाहिला होता. रणवीर सिंहच्या नकारानंतर शाहीद कपूरला विचारणा करण्यात आली. शाहीदचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता त्याच्या एकाही सोलो सिनेमाने १०० कोटींचा बिझनेस केला नव्हता. पण मला शाहीदवर विश्वास होता कारण तो उत्कृष्ट अभिनेता आहे.'
कबीर सिंह नंतर चांगलाच हिट झाला. सिनेमाचं बजेट 36 कोटी रुपये होतं तर सिनेमाने जगभरात एकूण 380 कोटींचा व्यवसाय केला.