'विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम विजय दीनानाथ चौहान, बाप का नाम, दीनानाथ चौहान, मां का नाम, सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र 36 साल...' असे अनेक दमदार संवाद लिहिणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान इंडस्ट्रीतील अष्टपैलू व्यक्तिंपैकी एक होते. आपल्या अभिनयाने त्यांनी इंडस्ट्रीला एक वेगळी ओळख दिली होती. ते केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते तर एक उत्कृष्ट विनोदकार, पटकथा लेखक आणि संवाद लेखक देखील होते. आजही त्यांचे संवाद लोकांच्या आठवणीत आहेत. अनेक चित्रपटांच्या यशामागे कादर खान यांचे दमदार संवादची महत्त्वाची भूमिका होती.
कादर खानचा जन्म २२ ऑक्टोबर 1937 रोजी अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये झाला होता, परंतु त्याचे कुटुंब नंतर मुंबईजवळ कामठीपुरामध्ये स्थायिक झाले.कादर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीने इंडस्ट्रीत मोठी धमाल उडविली होती. अमिताभ आणि कादर खान यांनी दो और दो पांच, मुकद्दर का सिकंदर , मिस्टर नटवरलाल , सुहाग, कुली, शहंशाह या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. अमिताभ यांच्या अमर अकबर अँथनी , सत्ते पे सत्ता , मिस्टर नटवरलाल आणि शराबी या चित्रपटांचे डायलॉगही त्यांनी लिहिले. पण इतके पुरेसे नव्हते. कादर खान यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक चित्रपट बनवायचा होता.
एका मुलाखतीत खुद्द कादर खान यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. अमिताभ बच्चन, जया प्रदा आणि अमरीश पुरी यांना घेऊन मला जाहिल हा चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मला करायचे होते, असे कादर खान या मुलाखतीत सांगितले होते. पण याचकाळात कुली चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ गंभीर जखमी झाले ते अनेक महिने रुग्णालयात होते. बरे झाल्यानंतर ते इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी झाले आणि राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे कादर खान यांचे अमिताभ बच्चनसोबत चित्रपट करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.