कादर खान यांचा आज म्हणजेच 11 डिसेंबरला वाढदिवस असून त्यांचा जन्म काबूलमध्ये म्हणजेच अफगाणिस्तान मध्ये झाला. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या काही वर्षांपासून कादर खान प्रचंड आजारी असून ते चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. कादर खान यांनी एक अभिनेता, एक लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये चांगलेच नाव कमावले आहे. त्यांच्या कॉमिक टायमिंगचे तर सगळेच प्रचंड कौतुक करतात.
कादर खान यांच्या नावावर एकेकाळी चित्रपट चालत असत. पण असे असूनही त्यांनी उतारवयात खूपच कमी चित्रपटात काम केले. चित्रपटात काम कमी करण्यामागे एक खास कारण असल्याचे त्यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. कादर खान यांनी २०१५ मध्ये हो गया दिमाग का दही या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ते आजारी असल्याने अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना त्यांच्यासोबत काम करायचे नाहीये. आजारपणामुळे खूपच कमी लोक त्यांना काम करण्याविषयी विचारत आहेत. ते एक चांगले अभिनेते असूनही केवळ आजारपणामुळे लोक त्यांच्यासोबत काम करायला तयार नाहीत या गोष्टीचे त्यांना प्रचंड दुःख वाटते. त्यांनी मुलाखतीत सांगितले होते की, सुरुवातीच्या काळात तर माझी तब्येत इतकी बिघडलेली नव्हती. वयानुरूप मला थोडासा त्रास होत होता. पण तेव्हापासूनच लोक माझ्यापासून दूर पळायला लागले होते. त्यांना माझ्यासोबत काम करण्यात रस नव्हता. एक कलाकार म्हणून मला या गोष्टीचा प्रचंड त्रास होत होता.हो गया दिमाग का दही या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी देखील त्यांना चालायला, बोलायला खूपच त्रास होत होता. पण तरीही अभिनयाविषयी असलेल्या त्यांच्या प्रेमापायी त्यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील ते सगळीकडे आवर्जून उपस्थिती लावत होते.
कादर खान यांनी डाग या चित्रपटापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी कुली, होशियार, हत्या यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. नव्वदीच्या तर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. त्यांनी चित्रपटाप्रमाणेच हाय पडोसी कौन है दोशी, हसना मत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आणि लिखाणासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कादर खान यांची तब्येत आता ढासळली असून ते त्यांचा मुलगा आणि सूनेशिवाय इतरांना पटकन ओळखत नाहीत असे नुकतेच त्यांच्या सूनेने मीडियाला सांगितले होते.