Join us

शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही कादर खान यांची इच्छा, अमिताभ बच्चन यांनाही दिला होता त्यांनी मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:28 PM

कादर खान यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 250 पेक्षा जास्त चित्रपटांचे संवाद लेखन केले. 

भारदस्त आवाज आणि चोखंदळ तसंच हरहुन्नरी अभिनेता म्हणून ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी छाप पाडली होती. कादर खान यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे.वयाच्या 81 व्या वर्षी 31 डिसेंबर 2018 रोजी कॅनडात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. दीर्घकाळापासून कादर खान आजारी होते. त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले होते.

 

अखेरच्या दिवसांत मुलगा आणि सून यांच्याशिवाय ते कुणालाच ओळखत नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडातील मुलाकडे राहत असलेल्या कादर खान यांना आजारावर मात करत कामावर परतायचे होते. अमिताभ यांच्यासोबत कादर खान यांना एक चित्रपटही बनवायचा होता, पण नियतीला कदाचित वेगळेच काही मान्य होते.कादर खान यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 250 पेक्षा जास्त चित्रपटांचे संवाद लेखन केले आहे. 

कादर खान यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक चित्रपट बनवायचा होता. एका मुलाखतीत खुद्द कादर खान यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. अमिताभ बच्चन, जया प्रदा आणि अमरीश पुरी यांना घेऊन मला जाहिल हा चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मला करायचे होते, असे कादर खान या मुलाखतीत सांगितले होते. पण याचकाळात कुली चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ गंभीर जखमी झाले ते अनेक महिने रुग्णालयात होते. बरे झाल्यानंतर ते इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी झाले आणि राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे कादर खान यांचे अमिताभ बच्चनसोबत चित्रपट करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

कादर खान आणि अमिताभ यांच्यात घट्ट मैत्री होती. मात्र जेव्हा अमिताभ राजकारणात गेले तेव्हा त्यांच्यात खूप बदल झाला होता. पूर्वीचे अमिताभ ते नव्हते असे काद खान यांनी म्हटले होते. राजकारण असे क्षेत्र आहे, जे व्यक्तीला पुर्णतः बदलून टाकते. जेव्हा ते राजकारणातून परतले तेव्हा त्यांच्यात मोठा बदल झाल्याचे जाणवले आणि याच कारणामुळे एकेकाळचे चांगले मित्र असलेले कादर खान आणि अमिताभ याच्यातही दुरावा निर्माण झाला होता.

 

कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांना राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला होता, पण बिग बींनी त्यांचे म्हणणे ऐकले नव्हते. अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांनी 'दो और दो पांच', 'मुकद्दर का सिकंदर', 'मिस्टर नटवरलाल', 'सुहाग', 'कुली', 'शहंशाह' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चन