अभिनेता, कॉमेडियन, दिग्दर्शक आणि डायलॉग रायटर कादर खान अखेरीस ‘हो गया दिमाग का दही’ या चित्रपटात बघावयास मिळाले होते. ‘कुली, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, शराबी आणि अमर-अकबर-अॅँथनी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे डायलॉग लिहणा-या कादर खान यांच्यासाठी बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते. कारण कादर खान यांचे लहानपण खूपच गरिबीत गेले. अशातही त्यांनी कधीच हार मानली नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केले. आज कादर खान यांच्याशी संबंधित एक रंजक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. होय, कब्रस्तानमध्ये बसल्यामुळे त्यांच्या अभिनय करिअरला सुरुवात झाली.
वास्तविक हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा कादर खान यांचे वय ८ ते ९ वर्षे होते. कादर खान यांची आई त्यांना नमाज पठण करण्यासाठी तेथील एका मस्जिदमध्ये पाठवित असे. मात्र कादर यांचे मन दुसरीकडेच असायचे. ते मस्जिदमध्ये न जाता शेजारील कब्रस्तानमध्ये जात असत. त्याठिकाणी तासन्तास ते मनात येईल ते बोलत असत. हा सिलसिला बरेच दिवस चालला. मात्र एक दिवस त्याच कब्रस्तानमध्ये त्यांचे नशीब पालटले.
तुम्हाला १९४२ मध्ये आलेला ‘रोटी’ हा चित्रपट कदाचित आठवत असेल, ज्याचे दिग्दर्शक महबूब खान होते. या चित्रपटात अशरफ खान नावाचे एक अभिनेते होते. त्या दिवसांमध्ये अशरफ खान रोमिओ-ज्युलियट यांच्यावर एक प्ले तयार करीत होते. या प्लेचे नाव होते, ‘वामक अजरा’! या प्लेमध्ये एका आठ-नऊ वर्षांच्या मुलाची गरज होती. ज्याला यंग प्रिंसची भूमिका साकारायची होती. त्याचबरोबर या मुलाला जवळपास ४० पानांच्या स्क्रिप्टचे स्मरणही करायचे होते.
अशरफ यांना कादर खान यांच्याविषयी माहिती झाले. त्यांनी बरेच दिवस कब्रस्तानमध्ये जाताना कादर खान यांचा पाठलाग केला. पुढे एक दिवस त्यांनी कादर खान यांना कब्रस्तानमध्ये जाऊन विचारले की, तू एका प्लेमध्ये अभिनय करणार काय? कादर यांनी म्हटले की, मला अभिनयाविषयी फारसे माहिती नाही. तेव्हा अशरफ यांनी कादर यांना दुसºया दिवसापासून आपल्या घरी अभिनय शिकण्यासाठी बोलाविले. बरोबर एक महिन्यानंतर कादर खान यांनी यंग प्रिंसची भूमिका साकारली. त्याकाळी त्यांचा अभिनय एवढा पसंत केला गेला की, लोक उभे राहून टाळ्या वाजवायचे. अशा पद्धतीने कादर खान यांच्या अभिनय करिअरला सुरुवात झाली.