मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, संवाद लेखक कादर खान यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर काही काळासाठी व्हायरल झाली. अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. मात्र, कादर खान यांच्या निधनाची बातमी चुकीची असून त्यांच्यावर कॅनडातील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांचा मुलगा सरफराज खान यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी कादर खान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना कॅनडामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, कादर खान यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशी इच्छा बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.
कादर खान यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1972 मध्ये आलेल्या 'दाग' या चित्रपटाद्वारे केली. आपल्या चार दशकांच्या सिनेकारकीर्दीत कादर खान यांनी तब्बल 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 'अदालत' (1976), 'परवरिश' (1977), 'दो और दो पांच' (1980), 'याराना' (1981), 'खून का कर्ज' (1991), 'दिल ही तो है' (1992), 'कुली नं. 1' (1995), 'तेरा जादू चल गया' (2000), 'किल दिल' (2014) अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. याशिवाय, कादर खान यांनी अभिनयासोबत अनेक चित्रपटांचे लेखन, पटकथा, संवाद लिहिले आहेत.