वीरू देवगण यांनी बॉलिवूडमध्ये अॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. वीरू देवगण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सांताक्रूजमधील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वीरू देवगण यांच्या पश्चात चार मुले असून अभिनेता अजय देवगण हा त्यांचा मुलगा आहे. अभिनेत्री काजोल ही त्यांची सून असून अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा ते सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असत. काजोल सोबत त्यांचे नाते खूपच खास होते. काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या सासऱ्यांच्या निधनाच्या काही दिवसांनंतर आता एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने त्यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करून त्यात लिहिले आहे की, हा आनंदाचा क्षण होता... त्यांना लाइफटाइम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या निधनांनंतर अनेकांना प्रचंड दुःख झाले. ते आपले आयुष्य खूपच चांगल्या प्रकारे जगले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो... त्यांच्यावर आम्ही नेहमीच प्रेम करत राहाणार...
वीरू देवगण यांच्या अंत्ययात्रेला काजोलला अश्रू अनावर झाले होते. काजोल ऐश्वर्या रायला मिठी मारून एखाद्या लहान मुलासारखी ओक्सबोक्शी रडली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघेही काजोलला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण तिला समजावणे कोणालाच शक्य नव्हते.
वीरू देवगण यांच्या अंत्ययात्रेला अमिताभ बच्चन शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, संजय दत्त, सनी देओल, बॉबी देओल, आर्यन मुखर्जी, साजिद खान, तुषार कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, अनिल कपूर, सुनील शेट्टी यांसारखे बॉलिवूडमधील अनेकजण उपस्थित होते.
वीरू देवगण यांनी ८० हून जास्त चित्रपटांमध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यांसारख्या अनेक चित्रपटांमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करता आले. वीरू यांनी क्रांती, सौरभ, सिंहासन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. ते या चित्रपटांमध्ये खूपच छोट्या भूमिकांमध्ये दिसले होते. त्यांनी फाईट मास्टर म्हणून काम करण्यासोबतच हिंदुस्थान की कसम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच या चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. अजय देवगण, काजोल आणि महिमा चौधरी यांची मुख्य भूमिका असलेल्या दिल क्या करे या चित्रपटाचे निर्माते देखील तेच होते.