Join us

२५ वर्षांमध्ये जराही बदलली नाहीये 'कुछ कुछ होता है'ची अंजली; काजोलने रिक्रिएट केला लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 5:18 PM

'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील काजोलच्या अंजली या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. आता २५ वर्षांनंतर काजोलने अंजलीचा लूक रिक्रिएट केला आहे.

बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'कुछ कुछ होता है'. प्रेमाचं त्रिकुट असलेल्या या सिनेमात शाहरुख खान, रानी मुखर्जी आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाली असली तरी अंजली आणि राहुलची क्रेझ मात्र आजही कायम आहे.  काजोलने या चित्रपटात अंजलीची भूमिका साकारून हे पात्र अजरामर केलं.

'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील काजोलच्या अंजली या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या चित्रपटात काजोलने साकारलेल्या अंजलीचा लूक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला होता. आता २५ वर्षांनंतर काजोलने अंजलीचा लूक रिक्रिएट केला आहे. काजोलने अंजलीसारख्या लूकचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत काजोलने अंजलीसारखे कपडे परिधान केले आहेत. त्याबरोबरच डोक्यावर टोपीही घातल्याचं दिसत आहे. 

काजोलने हा व्हिडिओ शेअर करत त्याला खास कॅप्शनही दिलं आहे. "२५ वर्षांनी पुन्हा अंजली बनले (बास्केटबॉल मिळाला नाही). खूप साऱ्या आठवणी आणि प्रेम या चित्रपटाबरोबर जोडलं गेलं आहे. या चित्रपटावर मी जितकं प्रेम करते, तितकंच सगळे करतात. करण जोहरचा हा पहिला चित्रपट आणि धर्मा प्रोडक्शनच्या प्रवासाची सुरुवात...या चित्रपटातील गाणी आजही अजरामर आहेत," असं काजोलने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

करण जोहरने 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्याचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात काजोल, शाहरुख, राणी मुखर्जी यांच्यासह अनुपम खेर, रिमा लागू, अर्चना सिंह, फरिदा जलाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. 

टॅग्स :काजोलशाहरुख खान