Join us  

'त्यांनी माझा पाठलाग करायला सुरुवात केली'; 'त्या' घटनेनंतर संतापली काजोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 3:18 PM

kajol: काजोलने एका मुलाखतीत तिला वांद्रे येथे आलेला पापराझींच्या अनुभवावर भाष्य केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल (kajol) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी तिच्या मस्तीखोर स्वभावामुळे तर कधी तिच्या उर्मटपणे केलेल्या वर्तनामुळे. मात्र, यावेळी ती द ट्रायल या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. जवळपास २९ वर्षानंतर काजोलने रुपेरी पडद्यावर किसिंग सीन दिला. त्यामुळे सध्या ती सातत्याने चर्चेत येत आहे.  यामध्येच काजोलने अलिकडेच या सीरिजनिमित्त एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने पापाराझींच्या कल्चरवर भाष्य केलं आहे. 

अलिकडेच काजोलने 'मिस मालिनी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने पापाराझींच्या वर्तनाविषय़ी भाष्य केलं. 'आता हे अती झालंय' असं ती यावेळी म्हणाली. "मला वाटतंय आता हे अती झालं आहे. हे एका दोलकाप्रमाणे आहे. जे एकदा सुरु होतं आणि मग त्याला कसलीच गरज लागत नाही ते सुरुच राहतं. पण, आता कुठे तरी हे थांबायला हवं. कारण, आपण एक कलाकार आहोत आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक बॅलेन्स असला पाहिजे. तेव्हाच हे कमी होईल", असं काजोल म्हणाली.

पुढे ती म्हणते,"काही दिवसांपूर्वी मी वांद्र्यात होते आणि पापाराझींना माझी गाडी दिसली. त्यांनी लगेच माझा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यावेळी मी कोणत्याही शूटसाठी किंवा सार्वजनिक ठिकाणी नव्हते. किंवा मी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा नव्हते. तरी ते माझ्या पाठी आले. आता, मी एक कलाकार असल्यामुळे माझ्या पाठीमागे का येताय? हा प्रश्न मी त्यांना विचारु शकत नाही. मी स्टार असल्यामुळे ७-८ लोक कायम माझ्या मागे कॅमेरा घेऊन फिरत असतात. त्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी वागताना काळजी घ्यावी लागते."

दरम्यान, काजोलला प्रायव्हसी जास्त आवडते. त्यामुळे ती कायम बाहेर असताना कॅमेरांपासून दूर जात असते काजोलप्रमाणेच तापसी पन्नू, जया बच्चन, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींनाही त्यांची प्रायव्हसी जास्त आवडते. त्यामुळे त्या कायम त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी उघडपणे बोलत नाहीत. 

टॅग्स :काजोलबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा