Join us

लॉकडाऊनमध्ये अजयने तुझ्यासाठी कितीदा जेवण बनवले? वाचा, काजोलने काय दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 14:03 IST

प्रश्न चाहत्यांचा, उत्तर काजोलचे...

ठळक मुद्दे काजोलच्या उत्तरांनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.

कोरोना व्हायरसचा वाढता धोका कमी करण्यासाठी देशभर लॉकडाऊन पुकारण्यात आले. लॉकडाऊनमुळे लोक आपआपल्या घरात कैद आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. होय, बॉलिवूडचे सेलिब्रिटी सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. सोबत सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह आहेत. अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. अभिनेत्री काजोलने चाहत्यांशी ‘ #AskKajol’द्वारे संवाद साधला. मग काय, चाहत्यांचे प्रश्न आणि काजोलची उत्तरे अशा मस्त ‘सिलसिला’ रंगला.

चाहत्यांनी काजोलला काही मजेदार प्रश्न विचारले. काजोलनेही या प्रश्नांना तेवढीच मजेदार उत्तरे दिलीत. ‘लॉकडाऊनच्या दिवसांत अजयने तुझ्यासाठी कितीदा जेवण बनवले?, असा सवाल एका चाहत्याने केला. यावर बिचारी काजोल काय उत्तर देणार? मी यासाठी अजयला अनेकदा प्रेरित करण्याचा प्रयत्न केला/ पण तो एकदाही किचनकडे फिरकला नाही, असे काजोलने सांगितले.

तुझी आवडती भूमिका कोणती? असा प्रश्न एकाने केला. यावर काजोलने अंजली असे उत्तर दिले. ती अगदी माझ्यासारखी आहे, असे तिने सांगितले.शाहरूखमधील सर्वाधिक आवडणारी गोष्ट कुठली, या प्रश्नावर त्याची एनर्जी, असे उत्तर तिने दिले.

एकंदर काय तर काजोलच्या उत्तरांनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. तासभर चाललेल्या या प्रश्नोत्तरांमधून चाहत्यांना काजोल नव्याने उलगडली नसेल तर नवल.

टॅग्स :काजोलअजय देवगण