बॉलिवूड अभिनेत्री काजोलची (Kajol) बहिण आणि अजय देवगणची मेहुणी तनिषा मुखर्जी (Tanishaa Mukerji) कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहे. तनिषाने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. इन्स्टास्टोरीवर तिनं लिहिलं, ‘मी कोव्हिड पॉझिटीव्ह आहे. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे.’ तनिषाच्या आधी उर्मिला मातोंडकर आणि दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांनाही करोनाची लागण झाली.
तनिषा मुखर्जी लवकरच ‘कोड नेम अब्दुल’ या चित्रपटात दिसणार आहे. तिचा हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. तनिषाने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत, चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतली. पण तिला फार काही यश मिळालं नाही. अनेक सिनेमे करूनही यश हुलकावणी देत असल्याचं पाहून तिने टीव्हीकडे मोर्चा वळवला सलमान खानच्या ‘बिग बॉस 7’मध्ये स्पर्धक बनून ती आली. मात्र या शोमध्येही तिच्या गेमपेक्षा तिच्या व अरमान कोहलीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीचीच चर्चा झाली होती. यानंतर खतरों के खिलीडी या रिअॅलिटी शोमध्यही ती दिसली होती.
सध्या तनिषाची सोशल मीडियावरच अधिक चर्चेत असते. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.एकेकाळी बोल्ड अभिनेत्री म्हणून मिरवणारी तनिषा बोटावर मोजण्याइतक्या सिनेमात दिसली पण लोकांना तिच्या सिनेमांपेक्षा काजोलची बहीण इतकीच तिची ओळख लक्षात राहिली. कदाचित काजोलची बहीण नसती तर तनिषा आजघडीला मोठी सुपरस्टार असती. अर्थात हे आमचं नाही तर खुद्द तनिषाचं म्हणणं आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुद्द तनिषानं तिच्या करिअरबद्दल अनेक खुलासे केले होते. बॉलिवूडमधून बाद होण्याचं कारणही तिनं सांगितलं होतं.‘मी बॉलिवूडमध्ये आले तेव्हा काजोल मोठी स्टार होती आणि मी तिच्याच सारखा अभिनय करावा, तिची कॉपी करावी ही लोकांची अपेक्षा होती. मी काजोलसारखं दिसावं, तिच्यासारखं बोलावं, अशी दिग्दर्शकांचीही अपेक्षा होती. पण मी काजोल नव्हते, मी तनिषा होते. सुरूवातीला काजोल व माझी तुलना व्हायची तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. राग यायचा. पण आज तुलना करणा-या त्या लोकांची मला किव येते. बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. पण यश मिळालं नाही. माझ्यामते, काही गोष्टी तुमच्या नशिबावर अवलंबून असतात,’ असं ती म्हणाली होती.