'कल हो ना हो' सिनेमा सर्वांच्या आवडीचा सिनेमा. हसवता हसवता शेवटी सर्वांनाच भावुक करणारा हा सिनेमा आजही तितकाच आवडीने पाहिला जातो. 'कल हो ना हो' सिनेमात शाहरुख खान, प्रिती झिंटा, सैफ अली खान या कलाकारांची प्रमुख भूमिका होती. 'कल हो ना हो'ची आजही तितकीच चर्चा होते. या सिनेमाविषयी एक किस्सा समोर आलाय जेव्हा एका सीनला कलाकारांच्या डोळ्यात खरंच पाणी होतं. ग्लिसरीन न वापरता सर्वांनी शूट केलं होतं आणि सेटवरचं वातावरण भावुक झालेलं.
सिनेमाचा महत्वाचा प्रसंग
सिनेमात भूमिका साकारणारी अभिनेत्री डेलनाज इरानीने 'कल हो ना हो'च्या शूटिंगचा अनुभव शेअर केलाय. डेलनाज म्हणाली की, "सिनेमाचा क्लायमॅक्स. जेव्हा अमनचा मृत्यु होतो. मला चांगलं आठवतंय त्यावेळी मी टीव्ही मालिकेचंही शूट करत होते. लागोपाठ शूट असल्याने दिग्दर्शकांना मी सांगितलेलं की, मला एक दिवसाची सुट्टी मिळू शकते का. तेव्हा ते म्हणाले होते की, हा सिनेमाचा खूप मोठा सीक्वेन्स आहे. सिनेमाचा खूप महत्वाचा प्रसंग आहे. त्यामुळे त्या सीनमध्ये त्यांना मी हवी होती."
ग्लिसरीन न वापरता केलं शूट
डेलनाज पुढे म्हणाली की, "मी काहीतरी नियोजन करुन त्यादिवशी कल हो ना होच्या सेटवर हजर झाली. इतक्या महत्वाच्या सीनला मी तिकडे आहे, याचा मला आनंद होता. अमनला हॉस्पिटलमध्ये शेवटची भेट घ्यायला सगळे एकत्र जमतात. ते वातावरण इतकं भावुक होतं की आम्ही कोणीही ग्लिसरीनचा वापर न करता तो सीन शूट केला. हा एक अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी." दरम्यान आज १५ नोव्हेंबरला 'कल हो ना हो' पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झालाय.