'कल्कि २८९८ एडी' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. महाभारताचा आधुनिक काळाशी संबंध जोडल्याने 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची वाहवा होतेय. या सिनेमात कमल हासन यांनी साकारलेल्या सुप्रीम यास्किन या खलनायकाची भूमिका चांगलीच गाजतेय. विशेष गोष्ट म्हणजे कमल हासन सरांचे हिंदी संवाद एका मराठमोळ्या अभिनेत्रीने लिहिले आहेत. या अभिनेत्रीचं नाव नेहा शितोळे.
नेहाने पोस्ट करुन दिली ही खास माहिती
नेहाने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो पोस्ट केलाय. यात 'कल्कि २८९८ एडी' मध्ये जी विशेष गाडी आहे ती तिच्या मागे दिसते. हा फोटो पोस्ट करुन नेहाने खुलासा केलाय की, "कल्कि २८९८ एडीची हिंदी आवृत्ती माझ्या काही शब्दांनी संपते. जेव्हा तुम्ही लिहिलेले शब्द कमल हासन सरांच्या आवाजात ऐकता तेव्हा ही भावना खूप विलक्षण असते. या भव्यदिव्य सिनेमाचा छोटासा भाग होणं ही माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे." अशा शब्दात नेहा शितोळेने स्वतः हा खुलासा केलाय.
नेहा शितोळेने याआधीही केलंय साऊथ सिनेमांसाठी संवादलेखन
नेहा शितोळेने याआधीही साऊथचा गाजलेला सिनेमा 'सीता रामम' साठी संवादलेखनाची जबाबदारी निभावली आहे. 'सीता रामम' सिनेमाचे हिंदीतील सर्व डायलॉग नेहा शितोळेने लिहिले आहेत. केवळ ५ दिवसात या सिनेमासाठी काव्यात्मक हिंदी संवाद लिहिण्याची मोठी जबाबदारी नेहाने सांभाळली. अशाप्रकारे अभिनय करण्यासोबतच साऊथ सिनेमांच्या हिंदी संवादांची महत्वाची जबाबदारी नेहा शितोळे निभावत आहे.