'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. अनेकजण सिनेमा पाहून कौतुक करत आहेत. आजवर कधीही न पाहिलेलं जग सिनेमात बघायला मिळाल्याने अनेकजण 'कल्कि २८९८ एडी'ची प्रशंसा करत आहेत. 'कल्कि २८९८ एडी' मध्ये महाभारतात घडलेले प्रसंग दिसतात. याशिवाय सिनेमाच्या सुरुवातीलाच श्रीकृष्ण-अश्वत्थामा संवाद दिसतो. सिनेमाच्या शेवटीही अर्जुनाच्या रथाचे सारथी बनून त्याला मार्गदर्शन करणारे श्रीकृष्ण दिसतात. संपूर्ण सिनेमात श्रीकृष्णाचा चेहरा दाखवण्यात आला नाही. त्यामागे काय कारण काय आहे? याचा खुलासा दिग्दर्शक नाग अश्विन यांनी केलाय.
म्हणून श्रीकृष्णाचा चेहरा दिग्दर्शकांनी दाखवला नाही
'कल्कि २८९८ एडी' सिनेमात श्रीकृष्णाचा चेहरा न दाखवण्यामागचे कारण स्पष्ट करताना दिग्दर्शक नाग अश्विन यांनी सांगितले की, "कृष्णाच्या व्यक्तिरेखेमागे त्याला कोणतीही ओळख न देता पडद्यावर सादर करणे आणि चेहरा न दाखवता निराकार ठेवणे ही कल्पना होती. कारण त्याचा चेहरा दाखवला असता तर तो फक्त एक व्यक्ती किंवा अभिनेता राहिला असता. कृष्णाला अधिक गडद रंगात दाखवून त्याला एक रहस्यमय व्यक्ती म्हणून सादर करण्याची कल्पना होती."
या कलाकाराने साकारलीय श्रीकृष्णाची भूमिका
'कल्कि २८९८ एडी'मध्ये श्रीकृष्णाची भूमिका कोणी साकारलीय याविषयी विविध तर्कवितर्क लावले जात होते. सिनेमात श्रीकृष्णाची भूमिका साकारल्या कलाकाराचा चेहरा लपवण्यात आला आहे. अखेर ही भूमिका कोणी साकारलीय याचा खुलासा झालाय. या अभिनेत्याचं नाव आहे आहे कृष्ण कुमार.
अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल सिनेमातील काही दृश्य दाखवत कल्कीचा कृष्ण दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वत: असल्याचं सांगितलं आहे. विशेष गोष्ट सांगायची तर, श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं खऱ्या आयुष्यातलं नावही कृष्णा आहे. ही महान व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर साकारण्याची संधी मिळाल्याने त्याने 'कल्कि 2898 एडी'च्या निर्मात्यांचे आभार मानले आहेत.