कमल हासन काढणार स्वत:चा राजकीय पक्ष; भगवा सोडून कुठलाही रंग स्वीकारण्यास तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 8:01 AM
अभिनेता कमल हासन यांनी अखेर स्पष्ट केले की, लवकरच ते स्वत:चा एक राजकीय पक्ष काढणार आहेत. दुसºया कुठल्याही पक्षात ...
अभिनेता कमल हासन यांनी अखेर स्पष्ट केले की, लवकरच ते स्वत:चा एक राजकीय पक्ष काढणार आहेत. दुसºया कुठल्याही पक्षात प्रवेश न करता कमल स्वत:चा पक्ष काढणार असल्याने सध्या चर्चेला उधान आले आहे. ‘द क्विंट’ला दिलेल्या एका मुलाखतीत कमल हासनने म्हटले की, राजकीय पक्ष काढण्याविषयी विचार करीत आहे. कारण सध्याचा कुठलाही राजकीय पक्ष माझ्या विचारांशी साम्य साधणारा नाही. कमल हासन यांना आतापर्यंत विविध पक्षांचे नेतेमंडळी भेटीसाठी पोहोचले आहेत. यामुळे कमल राजकारणात तर प्रवेश करणार नाही ना? अशा प्रकारच्या चर्चेला गेल्या काही काळात अक्षरश: उधान आले होते. शिवाय त्यांनीही राजकारणात येण्यासंदर्भात काहीसा कल दाखविल्याने ते कोणत्या पक्षात जातील याविषयी उत्सुकता लागली होती. मात्र आता कमल स्वत:चा पक्ष काढणार असल्याने त्याचे नाव काय असेल? याविषयी चर्चा रंगत आहे. दरम्यान, कमल हासन यांनी तामिळनाडूमध्ये सद्यस्थितीत असलेल्या राजकीय परिस्थितीविषयी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, एआयएडीएमकेने शशिकलाची पक्षातून हकालपट्टी करून एक चांगले पाऊल टाकले आहे. शशिकलाला पक्षातून बाहेर काढण्यासाठी मी सुरुवातीपासूनच बोलत होतो. माझ्या मते आता तामिळनाडूच्या राजकीय परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. कमल हासन सध्या तामिळ ‘बिग बॉस’ या शोला होस्ट करीत आहेत. त्यांनी संघ आणि भाजपावर केलेले वक्तव्य त्याकाळी खूपच चर्चेत राहिले होते. त्यावेळी हासनने म्हटले होते की, माझा कुठलाही रंग असू शकतो, केवळ भगवा नाही. दरम्यान, कमल हासन यांनी अशावेळेस नवा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे, ज्यावेळी सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगत आहे. रजनीकांतदेखील स्वत:चा पक्ष काढणार असून, नंतर भाजपाशी युती करणार असल्याची चर्चा आहे. जर या दोन सुपरस्टार्सचे पक्ष तामिळनाडूच्या राजकारणात आल्यास स्थानिक राजकारण ढवळून निघेल यात शंका नाही.