Join us

कमल हासन रूग्णालयात, पायाच्या हाडात झाले इन्फेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 12:03 PM

 रुग्णालयाने जारी केले मेडिकल बुलेटिन

ठळक मुद्दे कमल यांनी  1959 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

अभिनेता-राजकारणी कमल हसन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उजव्या पायाच्या हाडात इन्फेक्शन झाल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. तूर्तास कमल यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. रुग्णालयाच्या वतीने कमल हासन यांचे मेडिकल बुलेटिन जारी केले गेले. यात ही माहिती देण्यात आली आहे. कमल हासन श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये भरती आहेत.

‘कमल हासन यांच्या पायाच्या हाडात संक्रमण झाल्याने शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले गेले होते. टिबियल हाडातील संक्रमक फोकस हटवण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहे,’ असे त्यांच्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.कमल हासन यांच्या पायाला काही वर्षांपूर्वी इजा झाली होती. त्याच पायात संक्रमण झाले. यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. कमल हासन सध्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा पक्ष तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे. त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह टॉर्च आहे.  

 कमल यांनी  1959 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. पुढे हिरो म्हणून  एन्ट्री झाली आणि त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटात ते लीड हिरो म्हणून झळकले आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.  कालांतराने बॉलिवूडमध्येही त्यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला.  ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. यानंतर त्यांनी सागर,गिरफ्तार, जरा सी जिंदगी, राज तिलक, एक नई पहेली, चाची 420, हे राम अशा अनेक हिंदी सिनेमांत त्यांनी अभिनय केला. त्यांच्या सिनेमांइतकेच त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले.

टॅग्स :कमल हासन