Join us

बॉलिवूडमध्ये आणखी एका नात्याचा अंत! अभिनेता कमल सदाना व लीजाचा 21 वर्षांचा संसार मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 10:20 AM

काही दिवसांपूर्वीच अभिनेता आमिर खान व किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. आता कमल सदाना व लीजा यांनीही काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकमलचा पहिला सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही. मात्र यानंतर रिलीज झालेल्या ‘रंग’ या सिनेमाने त्याला एक नवी ओळख दिली.

कमल सदाना (Kamal Sadanah) हा अभिनेता अनेकांच्या विस्मृतीत गेला असेल. 1992 साली ‘बेखुदी’ या चित्रपटात कमल सदाना दिसला होता. यात त्याची हिरोईन होती काजोल.काजोलचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर काजोलने आपल्या फिल्मी करिअरमध्ये बराच मोठा पल्ला गाळला. पण या चित्रपटातील तिचा हिरो अर्थात कमल सदाना मात्र काळासोबत फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाला. आता हाच कमल सदाना पुन्हा चर्चेत आला आहे. होय, कमल व त्याची पत्नी लीजा जॉन यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता आमिर खान व किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. आता कमल सदाना व लीजा यांनीही काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Kamal Sadanah will divorce wife Lisa John )कमलची पत्नी लीजा एक मेकअप आर्टिस्ट आहे. कमलने ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तूर्तास कमल व लीजा दोघेही वेगवेगळे राहतात. कमल मुंबईत राहतो तर लीजा तिच्या आईवडिलांसोबत मुंबईत राहतेय. 21 वर्षांपूर्वी 1 जानेवारी 2000 रोजी दोघांचे लग्न झाले होते. दोघांना अंगथ नावाचा एक मुलगा व लीया नावाची एक मुलगी आहे.

कमल म्हणाला...पत्नीसोबत घटस्फोट घेत असल्याच्या निर्णयाला कमलने दुजोरा दिला. दोन लोक समजदार होतात आणि आपल्या आपल्या वाटेने निघून जातात. आम्ही पण त्यापैकीच आहोत, असे तो म्हणाला.

कमल सदानाने अभिनय सोडून अनेक वर्षे उलटली आहेत. कमलने पर्सनल लाईफमध्ये अनेक संकटांचा सामना केला. त्याचे वडील बृज सदाना यांनी कमलच्या डोळ्यांसमोर त्याच्या आई आणि बहिणीची हत्या केली होती. वडिलांनी कमलवरही गोळी चालवली होती. पण या हल्ल्यातून कमल थोडक्यात बचावला होता. कमलच्या 20 व्या वाढदिवसाच्या दिवशी ही घटना घडली होती.

कमलने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. माझ्या आई-वडिलांमध्ये सतत भांडणे व्हायची. त्यादिवशी माझा वाढदिवस होता. माझ्या 20 व्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या वडिलांनी आधी आईवर आणि नंतर माझ्या बहिणीवर गोळ्या झाडल्या. त्या दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. नंतर माझ्या वडिलांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. हे सगळे माझ्या डोळ्यांसमोर घडले. आई व बहिणीच्या हत्येचे दृश्य अनेक वर्षे माझ्या डोळ्यांसमोर येई. मी यानंतर अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये गेलो होतो. विशेष म्हणजे, वडिलांनी असे का केले, याचे उत्तर आजही कमलकडे नाही.

कमलचा पहिला सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही. मात्र यानंतर रिलीज झालेल्या ‘रंग’ या सिनेमाने त्याला एक नवी ओळख दिली. यानंतर त्याने बाली उमर को सलाम, रॉक डान्सर, हम सब चोर है, कर्कश, व्हिक्टोरिया नंबर 203 अशा अनेक चित्रपटांत काम केले. पण ‘रंग’ सारखे यश त्याला मिळू शकले नाही. पुढे कमल छोट्या पडद्याकडे वळला. दिग्दर्शनात आला. अ‍ॅक्टिंग सोडून मी आनंदी आहे, असे कमलने मुलाखतीत सांगितले होते.

टॅग्स :काजोलबॉलिवूड