‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 11:31 AM2019-01-20T11:31:06+5:302019-01-20T11:33:44+5:30
अभिनेत्री कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शित होतोय. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘मणिकर्णिका’च्या टीमला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. होय, कंगनाच्या या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे.
अभिनेत्री कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शित होतोय. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘मणिकर्णिका’च्या टीमला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. होय, कंगनाच्या या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. कमल यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे कळतेय. मुंबईच्या एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कमल जैन हे झी स्टुडिओस व कैरोस कोनटेंट स्टुडिओस सोबत मणिकर्णिका या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
कमल जैन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. ‘ रूग्णालयात दाखल होण्याची ही योग्य वेळ नाही.मणिकर्णिकाची संपूर्ण टीम,कंगना, प्रसूनजी, विजेयंद्रजी, शंकर अहसान, अंकिता, मिश्टी आणि इतर सर्वांना मी खूप मिस करतोय. मी लवकरच परत येईन. तो पर्यंत मी मनाने तुमच्या सोबत राहिन. आपण गेली दोन वर्षे मणिकर्णिकाला ब्लॉकबस्टर चित्रपट बनविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे.’ असे या टिष्ट्वटमध्ये लिहिले आहे.
Dear friends, this certainly is not the best time to be in hospital. Hope to get well soon and enjoy the success of our collective dream & hardwork. My best wishes to all pic.twitter.com/VnYLYxXlJc
— Kamal Jain (@KamalJain_TheKJ) January 19, 2019
तूर्तास करणी सेनेने या चित्रपटाला विरोध चालवला आहे. करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने या चित्रपटावर आक्षेप नोंदवत निर्मात्यांना पत्र पाठवले आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात एका गाण्यात लक्ष्मीबाईंना नृत्य करताना दाखवले गेले आहे. हे सभ्यतेला धरून नसल्याचा करणी सेनेचा आरोप आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवली गेलीच तर मात्र निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,असा इशारा या पत्रात दिला गेला आहे. इतकेच नाही तर या वादादरम्यान कंगनालाही करणी सेनेकडून आपल्याला धमक्या येत आहेत. अर्थात कंगनानेही करणी सेनेला प्रतिआव्हान दिलेय. होय, करणी सेनेनं मला धमक्या देणे थांबवले नाही तर मी एकालाही सोडणार नाही, मीदेखील एक राजपूत आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावे,अशा इशारा कंगनाने दिला आहे.