अभिनेत्री कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शित होतोय. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘मणिकर्णिका’च्या टीमला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. होय, कंगनाच्या या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. कमल यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे कळतेय. मुंबईच्या एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कमल जैन हे झी स्टुडिओस व कैरोस कोनटेंट स्टुडिओस सोबत मणिकर्णिका या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. कमल जैन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. ‘ रूग्णालयात दाखल होण्याची ही योग्य वेळ नाही.मणिकर्णिकाची संपूर्ण टीम,कंगना, प्रसूनजी, विजेयंद्रजी, शंकर अहसान, अंकिता, मिश्टी आणि इतर सर्वांना मी खूप मिस करतोय. मी लवकरच परत येईन. तो पर्यंत मी मनाने तुमच्या सोबत राहिन. आपण गेली दोन वर्षे मणिकर्णिकाला ब्लॉकबस्टर चित्रपट बनविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे.’ असे या टिष्ट्वटमध्ये लिहिले आहे.
‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 11:31 AM