शेखर सुमनने एकेकाळी बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर त्याचे प्रस्थ निर्माण केले. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा मुलगा अध्ययन सुमनने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. पण त्याला अभिनयक्षेत्रात फारसे यश मिळाले नाही. आज त्याचा वाढदिवस असून त्याने हाल ए दिन या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूड करियरला सुरुवात केली. अध्ययन त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आला. एकेकाळी तो कंगना रणौतसोबत नात्यात होता. कंगनासोबत त्याचे अफेअर चांगलेच गाजले होते. तसेच ब्रेकअपनंतर त्यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. कंगना जादू टोणा करते असा देखील आरोप त्याने केला होता.
अध्ययनच्या राज - द मिस्ट्री कंटीन्यूस या चित्रपटात कंगना त्याची नायिका होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. पण शेखर सुमनने मध्यस्ती करत अध्ययनला कंगनापासून दूर केले आणि दोघांमध्ये प्रेम नसून ते केवळ एक आकर्षण असल्याचे स्पष्टीकरण शेखर सुमनने दिले होते. तर २०१६ मध्ये अध्ययन सुमनने डीएनएला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने कंगनावर गंभीर आरोप केले होते. रिलेशनशिपदरम्यान कंगनाने माझा अतोनात शारीरिक आणि मानसिक छळ केला होता. ती मला मारायची, शिव्या द्यायची, एकदा तिने मला सँडलही फेकून मारली होती, असे अध्ययन या मुलाखतीत म्हणाला होता. तसेच एका पुरस्कार सोहळ्याला जाण्याआधी तिने मला टक्कल करायला लावले होते. तिथे गेल्यावर तिला पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारल्यावर तिने सगळ्यांचे आभार मानले होते. पण माझा उल्लेख देखील केला नव्हता.
कंगना जादूटोणा देखील करते असे देखील त्याने म्हटले होते. त्याने सांगितले होते की, कंगना मला एका ज्योतिषीकडे घेऊन गेली होती. तिथे मला एका रूममध्ये बसून काही मंत्र जपायला सांगितले होते. खरं सांगू तर माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये. पण तिच्यासाठी मी हे केले होते.