अभिनेत्री आणि राजकारणी कंगना राणौतने हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला झालेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं तिने म्हटलं आहे. संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती.
चेंगराचेंगरीमध्ये रेवती नावाच्या महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. यावर कंगना राणौत म्हणाली, "हे खूप दुर्दैवी आहे. मी अल्लू अर्जुनची खूप मोठी फॅन आहे, पण या घटनेतून आपल्याला एक उदाहरण द्यायचं आहे. त्याला जामीन मिळाला आहे, पण केवळ आपण हाय प्रोफाईल लोक असल्यामुळे याचा अर्थ असा नाही की, कोणत्याही परिणामांना सामोरं जाऊ नये."
"लोकांचा जीव खूप अनमोल आहे. धूम्रपानाच्या जाहिराती असोत किंवा थिएटरमधली गर्दी, मला वाटतं की 'पुष्पा 2' ची टीम त्या कार्यक्रमाला उपस्थित होती. त्यामुळे सर्वांना जबाबदार धरलं पाहिजे." अर्जुनच्या अटकेवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. रश्मिका मंदान्ना हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नोट लिहिली होती.
"माझा कायद्यावर विश्वास..."; जेलमधून बाहेर आल्यावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया
जेलमधून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह घरी पोहोचला आहे. घरी पोहोचल्यावर त्याने प्रेम आणि सपोर्टसाठी सर्व चाहत्यांचे आभार मानले. जेलमधून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने मीडियाशी संवाद साधला. तो म्हणाला - "काळजी करण्यासारखं काही नाही. मी ठीक आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. हे प्रकरण कोर्टात सुरू आहे त्यामुळे मी यादरम्यान काहीच भाष्य करणार नाही. मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. पोलिसांना सहकार्य करेन."