बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून भावाच्या लग्नात बिझी होती. याचमुळे पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावूनही ती चौकशीसाठी हजर राहिली नव्हती. मात्र आता मुंबई पोलिसांनी कंगना व तिची बहीण रंगोली यांना तिस-यांना समन्स बजावला आहे. त्यानुसार, कंगनाला 23 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले आहे तर रंगोलीला 24 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. राणौत भगिनींनी ट्वीट द्वारे हिंदू व मुस्लिमांमध्ये धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे.यापूर्वी वांद्रे पोलिसांनी समन्स बजावत कंगना व रंगोलीना अनुक्रमे 10 आणि 11 नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र भावाचे लग्न असल्याचे पुढील आठवडाभर मुंबईत येणे शक्य नसल्याचे कंगनाने पोलिसांना कळवले होते.
काय आहे प्रकरणहा समन्स कंगना विरोधात मुंबईतच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून पाठवण्यात आला आहे. स्थानिक कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल विरोधात 17 आॅक्टोबरला एफआयआर दाखल केला होता. कंगना आणि तिच्या बहिणीवर सोशल मीडियातील पोस्टच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. मुंबईतील एका कोर्टाने मुंबई पोलिसांना कथितपणे धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपात कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल विरोधात तक्रार दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने हा आदेश दिग्दर्शक मुनव्वर अली सय्यदच्या तक्रारीवरून पोलिसांना चौकशीचे आदेश दिले.
आक्षेपार्ह ट्वीटची मालिका पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधूंची जमावाने हत्या केली होती. त्यानंतर कंगनाने आक्षेपार्ह ट्वीट केले होते. मुंबई पालिकेने कंगनाच्या बंगल्यातील अतिक्रमण तोडले तेव्हाही ‘बाबर सेना’ असा उल्लेख करत तिने ट्वीट केले होते. या सर्वावर बोट ठेवत याचिकाकर्त्याने कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यावरही कंगनाने टीका केली होती. ‘ महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही’, असे ट्वीट करत कंगनाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते.