Join us  

Kangana Ranaut: 'इमर्जन्सी' नंतर कंगना रणौत अभिनयाला करणार रामराम? उत्तर देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 6:03 PM

Kangana Ranaut: कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. ट्रेलर लाँचवेळी तिने भविष्यात अभिनय करणार की नाही यावर भाष्य केलं.

खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. 'इंदिरा ही इंडिया और इंडिया ही इंदिरा' हा तिचा डायलॉगही लगेच लोकप्रिय झाला आहे. कंगनाच्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये आतुरता पाहायला मिळत आहे. मात्र आता मंडीची खासदार झालेली कंगना 'इमर्जन्सी' नंतर अभिनय कायमचा सोडणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचं उत्तर नुकतंच कंगनाने दिलं.

'इमर्जन्सी' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला कंगना या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, "मी अभिनय सुरु ठेवावा का याचा निर्णय लोकांनीच करावा असं मला वाटतं. उदाहरण सांगायचं तर मी कधीच असं म्हणलं नव्हतं की मी नेता बनेन. पण लोकच म्हणाले की तुम्ही नेता बनलं पाहिजे. मग पक्षाने सर्वेक्षण केलं तरी किंवा तिकीट देण्याचं मापदंड असलं तरी मी निवडणूक लढवली पाहिजे ही लोकांचीच इच्छा होती. जर इमर्जन्सी चालला आणि नंतर लोकांना मला पुन्हा पाहण्याची इच्छा असेल, जर मला यश मिळणार असेल तर मी अभिनय सुरु ठेवेन."

ती पुढे म्हणाली, "जर मला वाटलं की मला राजकारणात अधिक यश मिळत आहे आणि इथे माझी जास्त गरज आहे..तर आपण जिथे गरज असेल तिथे जातो. सम्मान मिळतो, व्हॅल्यू होते. आयुष्यात पुढे काय होतंय हे ठरेलच. मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ असा माझा काही प्लॅन नाही. जिथे माझी गरज असेल तिथे राहायला मला आवडेल."

'इमर्जन्सी' सिनेमा 6 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होत आहे. 1975 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात लावलेल्या इमर्जन्सीवर सिनेमाची कहाणी आधारित आहे. यामध्ये कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे.  तसंच अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण यांचीही भूमिका आहे. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडखासदारसिनेमा