अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या ‘थलायवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेला कंगनाचा ‘थलायवी’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. याच सिनेमाच्या निमित्तानं एक पत्रकार परिषद आयोजित केली गेली आणि या पत्रकारपरिषदेत कंगनाने हॉलिवूडच्या (Hollywood) सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. बॉलिवूड आणि प्रादेशिक सिनेमांना प्रोत्साहन देण्याची गरज तिनं यावेळी व्यक्त केली.
‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी आपल्याला आपल्या लोकांना आणि आपल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अमेरिकन आणि इंग्रजी चित्रपट भारतात प्रदर्शित होतात आणि या चित्रपटांमुळे आपल्या चित्रपटांना कमी स्क्रिन मिळतात. हॉलिवूडने आधीच फ्रेंच, इटालियन, जर्मन आणि अशा अनेक फिल्म इंडस्ट्रीची वाट लावली. भारतातही हेच घडताना दिसतेय. आपण लॉयन किंग व जंगल बुकच डब्ड व्हर्जन पाहतो. पण आपल्याच मल्याळम चित्रपटांचा डब्ड व्हर्जन आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याला आधी आपले चित्रपट बघायला हवेत. मग ते मल्याळम, तामिळ, तेलगू, पंजाबी अशा प्रादेशिक भाषेतील का असू देत. आपण आपल्या लोकांचे सिनेमे प्राध्यान्यानं पाहायला हवेत.असे केले तरच आपण आत्मनिर्भर भारत घडवू शकू,’ असं कंगना यावेळी म्हणाली.
या पत्रकार परिषदेत कंगनाला राजकारणात येण्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, ‘मी राजकीय नेता नाही तर एक जबाबदार नागरिक आहे. याच नात्यानं मी अनेक मुद्यांवर बोलते. राजकारणात येण्याबद्दल म्हणाल तर यासाठी मला लोकांच्या पाठींब्याची गरज आहे. सध्या तरी अभिनेत्री म्हणून आनंदी आहे. पण उद्या लोकांची इच्छा असेल तर मी नक्कीच राजकारणात येईल.’