नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावरुन ती बिनधास्तपणे आपली मुद्दे मांडत असते. आता तिने केलेलं ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कंगना राणौतनंबॉलिवूड महानायक बिग बी यांची पत्नी खासदार जया बच्चन यांच्या टीकेला आक्रमक उत्तर दिलं आहे. राज्यसभेत मंगळवारी जया बच्चन यांनी नाव न घेता कंगनावर निशाणा साधला होता.
याबाबत कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ''जया जी, तुम्ही तेव्हाही असंच बोलला असतात का जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला टीएनेजमध्ये मारहाण झाली असती, ड्रग्स दिलं गेले असतं आणि छेडछाड केली असती? तुम्ही त्यावेळीही हे बोलला असतात का जेव्हा अभिषेक बच्चनला त्रास दिला जात असता आणि एके दिवशी तो फासावर लटकलेला दिसला असता? आमच्याबद्दलही सहानुभूती दाखवा.''
राज्यसभेत जया बच्चन काय म्हणाल्या होत्या?
बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं खासदार जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या.
तसेच या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असं जया बच्चन म्हणाल्या. त्याचसोबत सरकारने मनोरंजन क्षेत्राला मदत केली पाहिजे. काही वाईट लोकांमुळे आपण संपूर्ण बॉलिवूडची प्रतिमा खराब करू शकत नाही. सोमवारी लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. जे स्वतः बॉलिवूड इंडस्ट्रीतील आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात जेवतो त्यालाच छिद्र करतो हे चुकीचे आहे. उद्योगाला शासनाची साथ गरजेची असते असंही त्या म्हणाल्या होत्या.
कंगनापासून बॉलिवूडमधील दिग्दर्शक राहतात दूर
ठाकरे सरकारसोबतच्या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौतची जोरदार चर्चा आहे. कंगना तशी स्वभावाने परखड. आपल्या या परखड स्वभावामुळे आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने अनेक वाद ओढवून घेतले आणि या वादांना पुरून उरली. यानंतर काय तर पंगा घेणारी अभिनेत्री अशीच तिची ओळख बनली. तिच्या या स्वभावामुळे बॉलिवूडचे काही दिग्दर्शक-निर्माते जाणीवपूर्वक कंगनापासून दूर राहतात, हे एक वास्तव आहे.
दिग्दर्शक विक्रम भटही यांना एका मुलाखतीत कंगनाबद्दल छेडले गेले. वादांच्या पार्श्वभूमीवर कंगनासोबत काम करण्याची संधी मिळाल्यास करणार का? असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर विक्रम यांनी अनोखे उत्तर दिले.‘मी तिच्यासोबत काय काम करणार? आजकाल ती स्वत:च सिनेमे दिग्दर्शित करतेय. मी तिच्यासोबत काम करणारच नाही, असे मी म्हणणार नाही. पण मी तिच्यासोबत करणार काय? तिच्यासोबत सिनेमा केला तर मला चित्रपटात क्लॅप मारावी लागेल. म्हणजे मी क्लॅप बॉयच्या भूमिकेत असेन. कारण कंगना स्वत:चा कथा लिहिते, स्वत:च दिग्दर्शित करते, अशात मला कामच उरणार नाही,’ असे विक्रम भट म्हणाले.
वाय दर्जाच्या सुरक्षेवर कंगनाचे उत्तर
शिवसेनेशी थेट पंगा घेऊन वादाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर आता कंगना हिमाचल प्रदेशात परतली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि ड्रग्सच्या विषयावरून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केल्याने कंगना व शिवसेना यांच्यात वादाला तोंड फुटले होते. मुंबई मला असुरक्षित वाटत असल्याचे विधान तिने केले होते. यानंतर केंद्र सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान या सुरक्षेसाठी केंद्र सरकार दहमहा लाखो रूपये खर्च करत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयातील वकील ब्रिजेश कलाप्पा यांनी कंगनाला दिलेल्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला होता. एखाद्या व्यक्तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्राला महिन्याला 10 लाखांहून अधिक पैसे खर्च करावे लागतात. हा पैसा कर भरणाऱ्या लोकांचा आहे. कंगना आता हिमाचल प्रदेशात सुरक्षित आहे. अशा स्थितीत मोदी सरकार तिला दिलेले संरक्षण हटवणार का? अशी विचारणा या वकिलाने केली होती. ब्रिजेश यांच्या प्रश्नाला कंगनाने उत्तर दिले आहे. ‘ब्रिजेशजी, मी काय विचार करते, तुम्ही काय विचार करता या आधारावर संरक्षण दिले जात नाही. इंटेलिजन्स ब्युरोकडून संभाव्य धोक्याचा तपास केला जातो. त्या धोक्याच्या आधारावर कुठल्या दर्जाचे संरक्षण पुरवायचे याचा विचार केला जातो. ईश्वराची इच्छा असेल तर पुढच्या काही दिवसांत मला दिलेले संरक्षण पूर्णपणे हटवलं जाईल. मात्र इंटेलिजन्स ब्युरोकडून खराब रिपोर्ट मिळाला तर कदाचित माझी सुरक्षा वाढवली जाईल, असं उत्तर कंगनाने दिलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
एक निगरगट्ट रात्र! राष्ट्रवादी आमदाराचा भयनाक अनुभव; आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर
बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र; खासदार जया बच्चन यांनी कंगना राणौतला फटकारलं
कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी संतप्त; चहुबाजुने टीकास्त्र, मित्रपक्षाची नाराजी अन् भाजपा एकाकी
“फोन बंद करु नका, काळ कठीण आहे; पहाटे ३ वाजताही कुणी कॉल केला तरी उचला”