कंगना राणौतला काल ट्विटरने जोरदार दणका दिला. मंगळवारी ट्विटरने तिचे अकाऊंट कायमचे सस्पेन्ड केले. ‘Koo’च्या संस्थापकाने मात्र कंगनाचे जोरदार स्वागत केले.
ट्विटरवर ‘बॅन’ झालेल्या कंगनासाठी ‘Koo’च्या पायघड्या, असे झाले WELCOME
ठळक मुद्देही ट्विटरसारखीच एक अॅप आहे. या अॅपला आत्मनिर्भर अॅप चॅलेंजचा अवार्डही मिळाला आहे.
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असललेल्या कंगना राणौतला (Kangana Ranaut) काल ट्विटरने जोरदार दणका दिला. मंगळवारी ट्विटरने तिचे अकाऊंट कायमचे सस्पेन्ड केले. ट्विटर अकाऊंट बॅन झाल्यानंतर कंगनाचे चाहते निराश झाले होते. पण आता चिंता नाही. ट्विटरने हकालपट्टी केली असली तरी ‘Koo’ अॅपने मात्र कंगनाच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरल्या. ‘Koo’च्या संस्थापकाने कंगनाचे जोरदार स्वागत केले.
‘Koo’चा सीईओ व सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्णनने सोशल मीडियावर कंगनाच्या ‘कू’ पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला. हा स्क्रिनशॉट शेअर करत, अप्रमेय राधाकृष्णनने कंगनाचे जोरदार स्वागत केले. ‘ही कंगनाची पहिली ‘Koo’ पोस्ट आहे. तिने ‘Koo’ला स्वत:च्या घरासारखे आणि अन्य अॅपला भाड्याचे म्हटले होते. जे अगदी योग्य आहे,’ असे राधाकृष्णनने लिहिले.
‘Koo’वरची पहिली पोस्ट...
यावर्षी फेबु्रवारी महिन्यात कंगनाने ‘कू’वर एन्ट्री घेत, पहिली पोस्ट शेअर केली होती.‘सर्वांना हॅलो, रात्री काम करतेय आणि सध्या धाकड क्रूचा लंच ब्रेक आहे. तेव्हा कू का करू नये? ही माझ्यासाठी नवी जागा आहे, त्यामुळे समजण्यास थोडा वेळ लागले. पण भाड्याचे घर शेवटी भाड्याचे असते आणि आपले घर आपलेच असते...,’ असे कंगनाने लिहिले होते.गेल्या काही महिन्यांपासून कंगना ट्विटरवर दिवसरात्र व्यक्त होत होती. सोबत ट्रोलही होत होती. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर कंगना तर कंगनाचे प्रत्येक ट्विट चर्चेत होते. महाराष्ट्र सरकारसोबतचा तिचा पंगा, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण आणि आता शेतकरी आंदोलनावर ती ट्विटरच्या माध्यमातूनच व्यक्त झाली. यादरम्यान तिच्या अनेक ट्विटनी वादही ओढवून घेतले. काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनावरील कंगनाच्या बेताल ट्विटवर ट्विटरने कारवाई केली होती. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी व पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत ट्विट केले होते. तिच्या या ट्विटला विरोध करत कंगनाने ट्विटचा भडीमार केला होता. थेट आंदोलनकर्त्या शेतक-यांना दहशतवादी म्हटले होते. यानंतर ट्विटरने कारवाई करत तिचे काही वादग्रस्त ट्विट डिलीट केले होते. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण ट्विटरने दिले होते.
काय आहे Koo ?
ही ट्विटरसारखीच एक अॅप आहे. या अॅपला आत्मनिर्भर अॅप चॅलेंजचा अवार्डही मिळाला आहे. हेअॅप Aprameya Radhakrishna आणि Mayank Bidwatka यांनी विकसीत केली आहे. हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, पंजाबी, ओडिशी, आसामी अशा अनेक भाषेत ही अॅपलॉन्च करण्यात आली आहे. गुगल प्लेस्टोरवर या अॅपला ‘बिल्ट फॉर इंडियन्स’ म्हटले गेले आहे. कनेक्ट विद इंडियन्स इन इंडियन लँग्वेज, अशी या अॅपची टॅगलाईन आहे.