बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगना राणौतला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर चर्चा सुरु झाली. अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
उद्योगजक मुकेश अंबानी यांना झेड प्लस तर त्यांची पत्नी नीता अंबानी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सरकारकडून मिळाणाऱ्या या सुरक्षेचा मोबदलाही घेण्यात येतो. कंगाना हा मोबदला सरकारला देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काय आहे वाय दर्जाची सुरक्षाकेंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा ज्या व्यक्तींना दिली जाते त्यांच्या सुरक्षेसाठी ११ जवान तैनात असतात. यात १ किंवा २ कमांडो, २ पीएसओ यांचा समावेश असतो. मागील वर्षी केंद्राने ११ पेक्षा जास्त लोकांना Y दर्जाची सुरक्षा दिली होती. ज्यात युपीचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचाही समावेश होता. म्हणजे आता कंगनासाठी १ किंवा २ कमांडो, २ पीएसओ आणि अन्य जवानांचा समावेश असणार आहे. यात एकूण ११ जवान संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.
केंद्राकडून कोणकोणत्या सुरक्षा दिल्या जातात? देशात विविध स्तरावर केंद्रीय गृहमंत्रालय सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घेते. यात नेत्यांपासून, व्हीआयपी आणि अशा व्यक्तिंना सुरक्षा देतात ज्यांच्या जीवाला धोका आहे. धमकीच्या दर्जाने सुरक्षा सुविधा देण्यात येते. यात X, Y, Z, Z+ अशा विविध दर्जाच्या सुरक्षा असतात. X कॅटेगिरीमध्ये २ पोलीस कर्मचारी, Y कॅटेगिरीमध्ये ११ जवान, Z कॅटेगिरीत २२ जवान यात एनएसजी कमांडोचा समावेश असतो. तर Z+ सुरक्षेत NSG कमांडोसह ३६ जवान सुरक्षेसाठी तैनात असतात. यावर जी सुरक्षा व्यवस्था असते ती म्हणजे एसपीजी..जी देशाच्या पंतप्रधानांना दिली जाते.
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं. कंगनानं आणखी एक ट्विट केले. त्यात लिहिलं होतं, एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मृत्यूनंतर मी ड्रग्स आणि फिल्म माफिया यांच्याविरोधात आवाज उठवला. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपासात दुर्लक्ष केले. त्यामुळे मुंबई पोलिसांवर मला विश्वास नाही. मला असुरक्षित वाटत आहे. याचा अर्थ मी फिल्म इंडस्ट्री आणि मुंबईचा तिरस्कार करते असा होतो का? असं तिने विचारलं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते.
कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशारा कंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला होता.