कंगना रणौत ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कंगना नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असते. आता बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगनाने राजकारणात एन्ट्री घेतली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून कंगना मैदानात उतरली आहे. मंडी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या कंगनानं बॉलिवूडमध्ये आपलं नाव चमकवलं. पण, कंगनाला कधीच अभिनय क्षेत्रात यायच नव्हतं.
कंगना रणौतला तिच्या करिअरच्या सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्रात जायचं होतं. तिला मॉडेलिंगमध्ये रस होता. पण चित्रपटात काम करण्याचा तिचा कोणताही विचार नव्हता. पण, परीक्षेत निकाला लागल्यावर फार कमी गुण आले. यानंतर कंगना राणौतने वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा विचार मनातून काढून टाकला. मुंबईत आल्यावर कंगना रणौत दीपक शिवदशानी दिग्दर्शित आय लव्ह यू बॉस या चित्रपटासाठी काम करत होती. मात्र यादरम्यान एका एजंटने तिला महेश भट्ट यांच्या कार्यालयात नेलं. महेश भट्ट यांनी तिला ऑडिशन देण्यास सांगितलं. अशा प्रकारे तिला तिच्या करिअरमधील पहिला चित्रपट 'गँगस्टर' मिळाला.
या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. या अभिनेत्रीने फॅशन, रिव्हॉल्व्ह रानी, क्वीन, सिमरन, लाइफ इन अ मेट्रो, तनु वेड्स मनू आणि मणिकर्णिका यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती 'इमर्जन्सी' या चित्रपटात इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही ती स्वत: करत आहे.