बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करते. त्यामुळे कधी-कधी तिला ट्रोल केलं जातं आणि वादाच्या भोवऱ्यात सापडते. कंगनाची स्पष्टवक्ते शैली पाहून ती राजकारणात येऊ शकते असा अंदाज अनेक दिवसांपासून वर्तवला जात होता. आता कंगना 2024 मध्ये भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवू शकते अशी जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, या माहितीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
कंगना राणौतराजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवू शकते, असंही म्हटलं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि त्यासोबतच भाजपा हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी देऊ शकते अशी चर्चा आहे.
कंगनानेही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत ही अभिनेत्री हिमाचलच्या मंडीतून तिकिटासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. भाजपाने आतापर्यंत हिमाचल प्रदेशातील चारपैकी दोन जागांवर आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. कांगडा आणि मंडी या दोन जागा शिल्लक आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा मंडी मतदारसंघातून उमेदवारीसाठी अनेक नावांवर विचार करत आहे, ज्यामध्ये कंगना राणौतच्या नावाचाही समावेश आहे.
राजकारणात येण्याबद्दल काय म्हणाली कंगना?
एबीपी न्यूजशी संवाद साधताना, कंगना राणौत निवडणुकीबद्दल म्हणाली होती की, "मी पक्षाची (भाजपा) प्रवक्ता नाही. हे जाहीर करण्यासाठी ही योग्य जागा आणि वेळ नाही... आणि असं काही घडलं तर पक्ष आपल्या परीने आणि योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी त्याची घोषणा करेल."