राज्याच्या राजकारणात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात अखेर गुरुवारी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाचं पालन करत देवेंद्र फडणवीसही मंत्रिमंडळात सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सिनेविश्वातूनही त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहोत. कंगना राणौत(Kangana Ranaut)ही सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे.
कंगना राणौत (Kangana Ranaut)सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. गुरुवारी पहिला व्हिडिओ शेअर करून 'पंगा क्वीन'ने हनुमानाला शिवाचा 12वा अवतार म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता आणि नंतर रात्री उशिरा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह लिहिले - 'यशाची किती प्रेरणादायी गोष्ट आहे... ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत... अभिनंदन सर.'
कंगना ही केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची समर्थक आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्रामावर कंगनाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली होती, 1975 नंतर भारताच्या लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा काळ आहे. 1975 मध्ये लोकनेते जय प्रकाश नारायणच्या एका गर्जनेने सिंहासन कोसळलं होतं. 2020 मध्येच मी म्हटलं होतं की, लोकशाही एक विश्वास आहे. जे लोक सत्तेचा गर्व, अहंकार बाळगत जनतेचा विश्वास तोडतात, त्यांचं गर्वहरण निश्चित होतं. ही कुण्या व्यक्तिची शक्ती नाही. ही शक्ती आहे, एका सच्च्या चरित्राची. हनुमानजीला शिवाचा 12 वा अवतार मानलं जातं आणि जेव्हा शिवसेनाच हनुमान चालिसा बॅन करत असेल तर तुम्हाला शिव सुद्धा वाचवू शकत नाही. हर हर महादेव, जयहिंद,.