मुंबईची तुलना पीओकेशी करून कंगना राणौतने एक वाद ओढवून घेतला. या वादाचे देशभर पडसाद उमटले. कंगना राणौत विरूद्ध शिवसेना वादाचे नाट्यही रंगले. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने शिवसेना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि सोनिया गांधीवर निशाणा साधला. आता कंगनाने राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने राहुल गांधींवर तोफ डागली. तिने राहुल गांधींच्या एका वक्तव्याची तुलना थेट आपल्या मुंबईला पीओके म्हटलेल्या वक्तव्याशी केली.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून बॉलिवूड अभिनेत्री कंगना हिने सर्वांचा रोष ओढवून घेतला होता. सोबत मुंबई पोलिसांबद्दल अविश्वास दाखवल्यानंतर तिला महाराष्ट्रात सर्व स्तरातून विरोधाला सामोरे जावे लागले होते. यानंतर कंगना शिवसेनेच्या निशाण्यावर आली होती. तिचे मुंबईस्थित कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे सांगून मुंबई पालिकेने त्यावर कारवाई केली होती. त्यामुळे कंगना राणौत अक्षरश: चिवताळली होती. यातून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना तिने लक्ष्य केले होते. तिचा हा सिलसिला आजही सुरु आहे.
काय म्हणाली कंगना?मुंबईत सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटल्याने मला अपशब्द बोलले गेलेत. माझे कार्यालय उद्ध्वस्त केले गेले. मला शिवीगाळ करण्यात आली. माझे थोबाड फोडण्याची धमकी दिली दिली. मला मुंबई पीओकेसारखी वाटू लागलीय, असे मी म्हणाले होते. मी पीओके म्हटले होते. पण माझ्यामते मी सीरिया म्हणायला हवे होते. कारण राहुल गांधींनी भारताची तुलना सीरियाशी केली होती. मात्र त्यावेळी त्यांच्यावर ना कोणी टीका केली, ना त्यांचे घर तोडले. माझ्यासोबतच या लोकांना कसली अडचण आहे? असा सवाल कंगनाने केला.
काय म्हणाली होती कंगना?सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर उघडपणे बोलणा-या कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारे वक्तव्य केले होते. ‘मला गुंड, माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटू लागलीय. मुंबईत मला हिमाचल प्रदेश किंवा थेट केंद्र सरकारची सुरक्षा हवी़ मुंबई पोलिसांची नको,’ असे ट्विट तिने केले होते.मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणारे ट्विट केल्यानंतर कंगनावर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिने आपल्या राज्यात निघून जावे, असा इशारा शिवसेना, मनसेने यानंतर दिला होता. एवढेच नाही तर कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते़ अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता ‘मुंबई मेरी जान’ म्हणत कंगनाला अप्रत्यक्षपणे तिच्या चुकीची जाणीव करून दिली होती. संजय राऊत यांनीही कंगनाला खडेबोल सुनावले होते़ यावर कंगनाने एक ट्विट करत, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती़ ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. याआधी मुबंईच्या रस्त्यावर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्याआणि आता उघडपणे धमक्या मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असे ट्विट कंगनाने केले होते.
'भांडणाची सुरूवात मी करत नाही, पण संपवते मीच', कंगना रणौतचा शिवसेनेला इशारा?
BMC वर भडकली कंगना, ऑफिसचे फोटो शेअर करत म्हणाली - 'हा माझ्या स्वप्नांचा बलात्कार'