बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत लोकसभा निवडणुकांपासून चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवून कंगना खासदार बनून संसदेत गेली. नुकतीच लोकसभेच्या अधिवेशनात खासदारकीची कंगनाने शपथ घेतली. आता खासदार झाल्यानंतर कंगना इंदिरा गांधी बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. ऑक्टोबर २०२३मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार होता. पण, त्यानंतर सिनेमाची रिलीज डेट बदलून २४ नोव्हेंबर करण्यात आली होती. त्यानंतरही सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती. १४ जूनला सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र काही कारणांमुळे पुन्हा एकदा सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता अखेर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आणि खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाला मुहुर्त मिळाला आहे.
कंगना रणौत मुख्य भूमिकेत असलेल्या 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. येत्या ६ सप्टेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे आता कंगनाच्या या बहुचर्चित सिनेमासाठी चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे.
'इमर्जन्सी' सिनेमातून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर भाष्य करण्यात येणार आहे. १९७५ सालचा आणीबाणीचा काळ यातून दाखविण्यात येणार आहे. कंगना रणौतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून यात ती इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात कंगनाबरोबर श्रेयस तळपदे, भुमिका चावला, अनुपम खेर, सतिश कौशिक यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.