देशात लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. १९ एप्रिल पासून विविध राज्यात मतदानाला सुरुवात होणार असून 4 जून रोजी निकाल लागणार आहे. सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतलाही (Kangana Ranaut)यावेळी लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. कंगना हिमाचल प्रदेश येथील मंडी मधून भाजपाकडून लोकसभा लढवणार आहे. कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीवर संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच आता मराठी अभिनेत्री कंगनासाठी 'विजय भव' अशी पोस्ट केली आहे.
कंगना रणौत निवडणूक लढवणार अशी गेल्या वर्षभरापासूनच चर्चा होती. कंगना आधीपासूनच राजकीय मुद्द्यांवर भाष्य करते. आता तिचा अधिकृतरित्या भाजपात प्रवेश झाला आहे. दरम्यान तिच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्हही उपस्थित होत आहेत तर चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होतोय. कंगनाच्या पाठिंब्यासाठी उतरलेल्या लोकांमध्ये मराठी अभिनेत्री मेघा धाडेही (Megha Dhade) आहे. मेघाने इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत लिहिले, 'अभिनंदन कंगना, विजयी भव:' असं म्हणत तिने कंगनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मेघा धाडे स्वत: सुद्धा राजकारणात आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला. यानंतर तिची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. मेघाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. याशिवाय अनेक मराठी कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला.