Join us

ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर कंगना रणौतने दिली पहिली प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 16:30 IST

कंगनाचे अकाऊंट बंद झाल्यानंतर आता तिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देकंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हटले आहे की, ट्विटरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते अमेरिकन आहे.

कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती देशातील अनेक सामाजिक प्रश्नांवर ट्विटरद्वारे भाष्य करत असते. तिचे ट्वीट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतात. तसेच तिला आजवर सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रोल देखील करण्यात आले आहे. पण आता ट्विटरकडून तिचे ट्विटर अकाऊंटच बंद करण्यात आले आहे. कंगनाचे अकाऊंट बंद झाल्यानंतर आता तिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून हा लोकशाहीचा खून आहे असे म्हणत ती रडताना दिसत आहे. या व्हिडिओत ती राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहे. तसेच तिने एक लेखी निवेदन देऊन तिचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तिने यात म्हटले आहे की, ट्विटरने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते अमेरिकन आहे. अमेरिकन लोक काळ्या (ब्राउन) लोकांना गुलाम बनवण्याच्या मानसिकतेने जन्माला आले आहेत. आपण काय विचार करावा, काय बोलावे किंवा काय करावे हे ते ठरवतात. सुदैवाने माझ्याकडे आणखी काही प्लॅटफॉर्म आहेत, ज्याद्वारे मी आवाज उठवू शकते आणि माझ्या सिनेमाबद्दल बोलू शकते.

तिने पुढे म्हटले आहे की, माझं मन देशातील त्या लोकांसाठी दुःखी आहे, ज्या लोकांवर अत्याचार होतात आणि ते दडपले जातात, त्यांना गुलाम म्हणून वागवले जाते आणि ज्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबून टाकले जाते. एवढे असूनही त्यांच्या दु:खाचा अंत होत नाही.

टॅग्स :कंगना राणौत