‘जजमेंटल है क्या’ या आगामी चित्रपटाच्या इव्हेंटदरम्यान कंगना राणौतने एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला. भर पत्रकार परिषदेत कंगना पत्रकारासोबत भांडली. या भांडणात कंगना राणौतची बहीण रंगोली उडी घेणार नाही, हे शक्यच नाही. ट्विटरवर एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विट करत तिने या वादात बहिणीची पाठराखण केली. शिवाय संबंधित पत्रकारावर सडकून टीका केली. ‘भेडीया भेल की खाल में...’ असे काय काय तिने लिहिले.
रंगोलीचे ट्विट
कंगना भर पत्रकार परिषदेत जस्टीन राव या पत्रकारासोबत भांडली. पाठोपाठ कंगनाची बहीण रंगोली हिनेही जस्टीन राव यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘ये देखो, बेशरम जर्नलिस्ट को. मी कंगनाबद्दल काहीच वाईट लिहिले नाही, असा दावा तो करतो. पण कंगना तिची खिल्ली उडवणा-यांना कधीच विसरत नाही,’ असे रंगोलीने लिहिले. ‘कुठल्याही कारणाने त्याने कंगनाला ट्रोल केले. तुम्हाला कंगना आवडत नसेल तर ठीक आहे. पण मग ती सर्वांसमोर तुम्हाला हग करेल, अशी अपेक्षा करू नका. भेडीया की खाल में भेड असलेल्यांना कंगना चांगली ओळखते. अशा लोकांनी तिच्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा करू नये,’ असेही रंगोली आपल्या ट्विटमध्ये म्हणाली.
ती इथेच थांबली नाही तर ‘अपनी मीडिया की हालत देखो. जबसे कंगनाने मोदी जी को सपोर्ट किया है और नॅशनलिस्ट फिल्में बनाई है, ये सब सो कॉल्ड लिबरल उसकी जान के दुश्मन बन गये है. येही जस्टीन राव उसके आगे पीछे घूमता था और फिर देखो क्या दुश्मन बन गया,’ असेही रंगोलीने लिहिले. सरकारने याविरोधात कडक कारवाई करावी, अशीही मागणी तिने केली.
काय आहे प्रकरण
पीटीआय वृत्तसंस्थेचे पत्रकार जस्टीन राव यांनी पत्रकार परिषदेत कंगनाला प्रश्न विचारला. प्रश्न विचारण्याआधी त्यांनी आपले नाव सांगितले. त्यांचे नाव ऐकून कंगनाला तिच्याबद्दल लिहिलेली एक बातमी आठवली. ‘मणिकर्णिका’च्या प्रदर्शनावेळी तिच्याबद्दल ही बातमी लिहिण्यात आली होती. मग काय, क्षणात कंगनाचा पारा चढला आणि तिने पत्रकारावर हल्लाबोल केला. ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या वेळी माझ्याबद्दल जाणीपूर्वक खोट्या बातम्या लिहिल्या गेल्यात. माझ्याविरोधात खोट्या गोष्टी ट्विट केल्या गेल्यात, असा आरोप तिने केला. एवढेच नाही तर जस्टीन राव यांच्यावरही तिने आगपाखड केली. ‘मणिकर्णिका’च्या रिलीजवेळी जस्टिन राव माझी मुलाखत घ्यायला आले होते. ते तीन तास माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते. त्यांनी माझ्यासोबत जेवणही केले. पण तरीही माझ्या आणि माझ्या चित्रपटाबद्दल वाईट गोष्टी लिहिल्या. त्यांनी नंतर मला मॅसेजही केला होता, असे कंगना म्हणाली. तिच्या या आरोपानंतर जस्टीन राव यांनीही आपली बाजू मांडली. कंगनाने केलेले सगळे आरोपत्यांनी फेटाळून लावले. पत्रकार नेहमी सत्य तेच लिहितात. मी तुझ्याविरोधात काहीही वाईट लिहिलेले नाही. मी कधीही तुझ्यासोबत जेवण केलेले नाही आणि तुझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मी कधीच तीन तास घालवले नाहीत, असे जस्टीन राव म्हणाले. शिवाय मी तुझ्याविरोधात ट्विट केले असेल तर त्याचा व तुला केलेल्या मॅसेजचा स्क्रिनशॉट दाखव, असे आव्हानही त्यांनी कंगनाला दिले. त्याचा हा पवित्रा पाहून, मी हे नंतर शेअर करेल, असे कंगना म्हणाली.