कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील वाद आणखी पेटत चालला आहे. बुधवारीच कंगना मुंबईत पोहोचली आणि त्याआधीच बीएमसीने तिच्या ऑफिसची तोडफोड केली. कंगनाने याचवर्षी तिच्या प्रॉडक्शन हाऊससाठी ऑफिस सुरू केलं होतं. ऑफिस तोडल्यावर कंगना चांगलीच संतापली असून ती सतत राज्य सरकारवर सोशल मीडियातून टीका करत आहे. कंगनाने आता तिच्या तोडलेल्या ऑफिसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून तिचे फॅन्स दु:खं व्यक्त करत आहेत.
एका यूजरने कंगना रनौतच्या या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, 'तुम्ही काळजी करू नका...देव सगळं बघतो आहे'. कंगनाच्या एका दुसऱ्या फॅन्सने म्हटले आहे की, 'तुम्ही खऱ्या अर्थाने वाघीण आहात आणि अशाच लढत रहा. कारण सगळा हिंदुस्थान तुमच्यासोबत आहे'.
कंगनाचा शिवसेनेवर निशाणा....
अभिनेत्री कंगना राणौतनं आधी शिवसेनेवर निशाणा साधला होता. तिने ट्विटमध्ये लिहिले होते की, ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, आज ते सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेना ते सोनिया सेना बनली आहे, ज्या गुंडांनी माझ्यामागे माझं घर तोडलं त्यांना सिविक बॉडी म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका अशा शब्दात कंगना राणौतनं शिवसेनेवर आरोप केला आहे.
कंगना राणौतनं ट्विट करुन सांगितलं आहे की, तुमच्या वडिलांचं चांगलं कार्य तुम्हाला पैसा देऊ शकतात पण सन्मान स्वत:ला कमवायला लागतो. माझं तोंड बंद कराल पण माझा आवाज लाखो लोकांपर्यंत पोहचेल. किती जणांची तोंडे बंद करणार? किती आवाज दाबणार? कधीपर्यंत सत्यापासून पळत राहणार तुम्ही काहीच नाही फक्त घराणेशाहीचं उदाहरण आहात अशी घणाघाती टीका कंगनानं केली आहे.त्याचसोबत निवडणुकीत हरल्यानंतर निर्लज्जपणे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत शिवसेनेचं सोनिया सेनेत रुपांतर केले असंही कंगनानं म्हटलं आहे.
दरम्यान, कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादात बुधवारी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री कंगनाने ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. रात्री केलेल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मी आता आपल्या मुंबईत आहे. आपल्या घरात आहे. माझ्यावर वारसुद्धा करण्यात आला, पण तो मी विमानात असताना मागून करण्यात आला. मला समोरून नोटिस देण्याची किंवा समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही. माझ्या कार्यालयाच्या करण्यात आलेल्या नुकसानामुळे अनेक लोक दु:खी आणि चिंतित आहेत. मी त्यांचे आशीर्वाद आणि प्रेमासाठी ऋणी आहे असं कंगनानं म्हटलं होतं.
हे पण वाचा :
बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तर
माझ्या शत्रूमध्ये समोरून वार करण्याची हिंमत नाही, कंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा वार