बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या 'तेजस' सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. नुकतंच तिची योगायोगाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी भेट झाली. कोणताही विषय असो कंगनाची प्रतिक्रिया हमखास येतेच. सध्या सुरु असलेल्या इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धावरही कंगनाने मत व्यक्त केलं होतं. आता नुकतंच तिने इस्त्रायलचे राजदूतांची भेट घेतली. 'हमास आधुनिक रावण असून लवकरच त्यांचा विनाश होईल' असं ती त्यांना म्हणाली.
अभिनेत्री कंगनाने दिल्ली येथील इस्त्रायल दूतावास येथे राजदूत नाओर गिलोन यांची भेट घेतली. कंगनाने इस्लामिक दहशतवादाचा विरोध केला आहे. या भेटीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले,'आज संपूर्ण जग विशेषत: इस्त्रायल आणि भारत दहशतवादाविरोधात लढत आहेत. काल जेव्हा मी रावण दहनासाठी दिल्लीत पोहोचले, तेव्हा मला वाटलं की इस्त्रायल दूतावास येथे जाऊन त्या लोकांना भेटलं पाहिजे जे आधुनिक युगातील रावणरुपी हमाससारख्या दहशतवादाचा विनाश करत आहेत. ज्या प्रकारे लहान मुलं, महिलांना लक्ष्य केलं जात आहे हे खूपच हृदयद्रावक आहे. या युद्धात इस्त्रायलचा विजय होईल अशी मला पूर्ण आशा आहे. त्यांच्यासोबत मी माझ्या आगामी तेजस फिल्मची आणि भारताच्या आत्मनिर्भर तेजस या लढाकू विमानावरही चर्चा केली.'
काही दिवसांपूर्वीच कंगनाने इस्त्रायलला पाठिंबा देण्यासाठी आवाज उठवला होता. तिथल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे फोटो पाहून भीती वाटत असल्याचे सांगितले. दहशतवादी महिलांच्या मृतदेहासोबतही बलात्कार करत आहेत.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं ती लवकरच 'तेजस' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय तिचा साऊथमध्ये चंद्रमुखी 2 हा सिनेमा येणार आहे. तर तिच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.