Kangana Ranaut Mother Asha Ranaut Reaction, Supriya Srinate Controversy: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघामधून भाजपाने तिकीट दिले. कंगनाला उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली. त्यात कंगनाचा बोल्ड फोटो पोस्ट करून, ‘आज मंडी मे क्या भाव चल रहा है?’, असा प्रश्न विचारला गेला होता. या पोस्टवरून बराच वाद निर्माण झाल्यानंतर, श्रीनेत यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले. त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. तसेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा अॅक्सेस असलेल्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकारावर आज कंगना राणौतची आई, आशा राणौत यांनी भाष्य केले.
"त्यांच्या घरातदेखील मुली आहेत, सुना आहेत. त्या स्वत: महिला आहेत. आता त्यांनी विचार करायला हवा की त्यांच्या मुलीबाळींना जर कुणी असं बोललं तर त्यांच्या मनावर किती मोठा आघात होईल. हीच भावना सध्या माझ्या मनात आहे. एखादी महिला सेलिब्रिटी आहे, लोकप्रिय आहे, संपूर्ण देशभरात तिचे नाव आहे, अशा व्यक्तीबाबत तुम्ही वाईट आणि आक्षेपार्ह बोलत असाल तर तुम्ही स्वत:च्या घरातल्या व्यक्तिंचा विचार करायला हवा. कारण जेव्हा तुमच्या मुलीला कुणीतरी असं बोलेल तेव्हा तुमच्या मनाला जितक्या वेदना होतील, त्याच वेदना सध्या मला होत आहेत. पण एक मात्र नक्की, सगळेच लोक किंवा सर्वच महिला वाईट नसतात. काही महिलाच अशा वागतात, सगळ्याच विचित्र नसतात", अशा शब्दांत कंगना राणौतची आई आशा राणौत यांनी सुप्रिया श्रीनेत यांचा समाचार घेतला.
दरम्यान, भाजपाच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कंगना राणौतबाबत सुप्रिया श्रीनेत यांनी जी पोस्ट टाकली होती. ती डिलीट केल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना काही दावे केले. सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की, माझ्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटचा अॅक्सेस असलेल्या कुणीतरी व्यक्तीने अत्यंत आक्षेपार्ह अशी पोस्ट शेअर केली आहे. ती नंतर डिलीट करण्यात आली आहे. मी कुठल्याही स्त्रीबाबत असं काही लिहिणार नाही हे मला ओळखणाऱ्यांना माहिती आहे. तसेच माझ्या नावाचा गैरवापर करून विडंबन करणारे @Supriyaparody नावाचे एक एक्स खाते सुरू आहे. त्यामधून या गैरप्रकाराला सुरुवात झाली असून, आम्ही त्याबाबत तक्रार दाखल करत आहोत, असेही सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले होते.